REVIEW – मिर्झापुर 2

ह्याची घेत,
त्याची घेत,
ह्याला त्याला शिव्या देत,
डझनभर टिझर,
शेकडो मोशन पोस्टर्स आणि दररोज मिर्झापूर येतंय असं सांगणारे असंख्य प्रोमोशनल व्हिडिओज् प्रेक्षकांच्या माथी मारून अखेरीस मिर्झापुर 2 एकदाचे आले. प्रमोशन साठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून उत्कंठावर्धक टिझर्स, ट्रेलर्स दाखवुन ऐन वेळेवर निर्मात्यांनी प्रेक्षकांचा अक्षरशः भ्रमनिरास केला एवढंच म्हणावं लागेल.

गेल्या सिझनला बदलाच्या भावनेतून उफाळून निघणारे गुड्डू आणि गोलू सिझन 2 मध्ये अगदी रक्ततांडव करतील, अशी आस प्रेक्षक लावून बसलेले, कालीन भैय्या राजकारणाचे नवे डावपेच आखून सर्व विरोधी गटाची दाणादाण उडवून देतील आणि रतिशंकर शुक्लाच्या हत्येनंतर त्याची गादी सांभाळताना त्याचा मुलगा आपले नवे पर्व सुरू करू बघेन, IPS मौर्या दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्राण पणाला लावून काम करेन असे वाटलेले, मात्र मिर्झापुर-२ चे कथानक असे काही रेंगाळणारे आणि कमजोर निघाले आहे ज्यातून कसलाच आनंद प्रेक्षक घेऊ शकत नाहीत.

वेबसिरीज मध्ये शिव्या घातल्या, थोडे इंटिमेंट सीन्स टाकले आणि रक्त दाखवले की लोक ती डोक्यावर घेतात असा गैरसमज कदाचित निर्मात्यांना झालेला दिसतो, म्हणूनच कदाचित लौललित, आणि नियमीत दिल्या जाणाऱ्या मा, बह, भोस*** ह्या शिव्या सोडून कुठलाच डायलॉग प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाही.

गेल्या भागात इतर माफिया म्हणजेच रतीशंकर शुक्ला (मृत), लाला यांसारखे माफिया देखील सिझन 2 मध्ये नरमल्याचे बघायला मिळते त्यामुळे शेरास सव्वाशेर कुणीही उरत नाही. दरम्यान गुड्डू पंडितच्या वडिलांचे पात्र तर अक्षरशः संताप आणणारे आहे. ज्या शहरात सर्व एकमेकांच्या रक्ताची तहानलेले आहहेत तिथे हा बाप आपल्या पोराला (गुड्डूला) अटक करण्यासाठी धडपडतो आहे. मागील भागात दिसणारी व्यापाराची पार्श्वभूमी, गुन्हेगारीचा विस्तार आणि त्यातून घडत बिघडत जाणारी सामाजिक व्यवस्था मिर्झापूर-२ मध्ये दाखवण्यात निर्माते सपशेल अयशस्वी झाल्याचे दिसते. कुठलीही वेबसिरीज ही प्रेक्षक लक्षात ठेवतात तिच्या क्लायमॅक्सवरून. मात्र मिर्झापुर-२ च्या क्लायमॅक्स हा इतका सामान्य का घेतला हा प्रश्न सर्वांना पडतो. ह्यातून नेमके साधायचे काय होते, हेच समजेनासे होते.

या भागात नव्याने भर पडली आहे ती दद्दा त्यागी नामक व्यापारी व त्याच्या घराण्याची. मुळात नवीन भर पडलेले कलाकार हे अभिनेते म्हणून उत्तम असल्याने त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी नीट पार पडल्याचे दिसते. जर ही वेबसिरीज काही अंशी जरी बघण्यालायक बनली असेल, तर त्याचे सर्व श्रेय अभिनेत्यांना जाते, ज्यांनी आपापली कामे नीट पार पाडलीत.

मिर्झापुर-२ चे वैशिष्ट्य म्हणजे उत्तम अभिनय, बॅकग्राऊंड स्कोर, सुसंबद्ध एडिटिंग आणि एक्शन्स सीन्स च्या वेळी दिसणारा इम्पॅक्ट. ह्या ३ बाबी सोडून ही वेबसिरीज तुमच्या तोंडून निर्मात्यांना शिवी द्यायला भाग पडल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की.

मिर्झापुर – 2 कलाकार – पंकज त्रिपाठी, अली फाजल, श्वेता त्रिपाठी, दिव्येन्दु शर्मा, रसिका दुग्गल इ.
दिग्दर्शक – गुरमित सिंग, मिहीर देसाई
ओटीटी – ऍमेझॉन प्राईम

प्रज्वल खेडकर

Leave a Reply

%d bloggers like this: