IPL 2020 – मुंबईचा चेन्नईवर दणदणीत विजय

दुबई – आयपीएलच्या तेराव्या हंगामत मुंबई इंडियन्सने विजयाची आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकत फक्त ११४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या इशान किशन-क्विंटन डी कॉक जोडीने नाबाद शतकी भागीदारी करत लक्ष्य पूर्ण केलं. किशनने नाबाद ६८ तर डी कॉकने नाबाद ४६ धावा केल्या आणि मुंबईला १० गडी राखून विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, जगदीशन, फाफ डु प्लेसिस आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा हे फलंदाज पॉवरप्लेमध्येच बाद झाले. कर्णधार धोनी संयमी खेळत असतानाच राहुल चहरने धोनीला (१६) झेलबाद करवले. नवख्या सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने ४ तर बुमराह आणि राहुल चहरने २-२ बळी टिपले. नॅथन कुल्टर-नाइलनेही एका फलंदाजाला माघारी धाडलं.

Leave a Reply

%d bloggers like this: