आवर्जून पुस्तक वाचा, आम्हाला कळवा!

वाचन प्रेरणा दिनानिमित्त (१५ ऑक्टोबर) पुस्तकांचं गाव प्रकल्पाचे आवाहन

पुस्तकांचं गाव, भिलार – कोरोना – काळातही पुस्तकांचं गाव, भिलार या प्रकल्पाच्या माध्यामातून वाचन प्रेरणा दिनानिमित्त (१५ ऑक्टोबर ) पुस्तकांची आणि वाचनाची आवड वाढवणारे उपक्रम योजण्यात आले आहेत, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. दि. १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत आवर्जून, निश्चयाने किमान १ (किंवा अधिक) पुस्तक वाचावे, असे आवाहान प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत हे ‘पुस्तक वाचनाचे आवाहान‘ समाजमाध्यमांद्वारे (सोशल मीडियाद्वारे ) पोहोचवण्यात आले आहे. तसेच वाचकांनी आपल्या वाचनाचा तपशील (आपले नाव, गाव, वाचनाचा वेळ, पुस्तक-लेखक- प्रकाशनाचे नाव, पृष्ठ संख्या, वाचन करतानाचे छायाचित्र इ… ) pustakangaav.rmvs@gmail.com या इ-पत्त्यावर किंवा ९५४५१ २६००७ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत, असेही कार्यालयाने कळवले आहे.

गेल्या ५ वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने, भारतरत्न डॉ.ए. पी. जे अब्दूल कलाम यांचा जन्मदिन (१५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. संपूर्ण राज्यातील उत्साही आणि जाणकार वाचकांमुळे वाचन प्रेरणा दिन हा आता एक लोकोत्सव झाला आहे. पुस्तकांचं गाव, भिलार येथेही गेली २ वर्ष वाचनध्याससारखे सलग वाचनाचे उपक्रम योजण्यात आले होते. कोरोना-संकटामुळे अनेक मर्यादा असल्याने यंदा वेगळ्या, अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येत आहे.

व्हर्च्युअल अभिवाचन आणि व्याख्यानही

पुस्तक वाचनाच्या आवाहनाबरोबरच प्रकल्प कार्यालयाच्या वतीने व्हर्च्युअल अभिवाचन आणि व्याख्यानही योजण्यात आले आहे. दि. १५ ऑक्टोबर, २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक पुस्तकप्रेमी वाचक (सुमारे २०) त्यांच्या आवडत्या पुस्तकाचे प्रत्येकी ३ मि. अभिवाचन करणार असून, सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. कृष्णात खोत अभिवाचकांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दि. १५ ऑक्टोबर रोजी स. १०.३० ते १२.३० या वेळात अभिवाचन व व्याख्यान होणार असून, पुस्तकांचं गाव प्रकल्पाच्या फेसबुक पेजवर व्हर्च्युअल कार्यक्रमाची लिंक (दुवा) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पुस्तकांच्या गावातील (भिलार मधील) विविध उपक्रमांत वाचनप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग असतोच. ‘आवर्जून पुस्तक वाचा, आम्हाला कळवा’ या उपक्रमासह व्हर्च्युअल व्याख्यानातही जास्तीतजास्त पुस्तकप्रेमींनी आपला सहभाग नोंदवावा, असे आग्रही आवाहन राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्री. संजय कृष्णाजी पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: