हाथरस प्रकरणी केंद्र सरकारने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे; आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाची मागणी

पिंपरी, प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे निषेधार्ह आहे. उत्तरप्रदेश पोलीस आणि प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल निर्माण होत आहे. या प्रकरणावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केली आहे.        

रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की हाथरस येथे घडलेली घटना पाशवी आहे. त्यामुळे केवळ राग व्यक्त करून चालणार नाही. तर अशा प्रवृत्तींच्या विरोधात न्याय मिळेपर्यंत उभे ठाकले पाहिजे. अतर्क्यपणे वागणाऱ्या प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात नागरिकांना कायद्याचे कसलेच भय राहिलेले दिसत नाही. या घटनेने हे पुन्हा सिद्ध केले आहे. उत्तर प्रदेशात महिला व मुलींवर यापूर्वीही अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र, तिथलं सरकार याबाबत गंभीर नसल्याचे दिसते. हाथरस येथील अमानवीय घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे. पोलीस प्रशासनही दबावात काम करत असल्याचे यावरून दिसते. पीडित कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या पक्ष, संघटना लढा देत आहेत, त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ असणार आहे, असे आश्वासन रामभाऊ जाधव यांनी दिले.     

कित्येक वर्षे महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असून, हे सत्र कधी थांबेल असा सवाल आता महिला विचारत आहेत. अत्यंत क्रूरपणे या मुलीला मारण्यात आले. मुलीच्या मृत्युनंतर मृतदेह कुटुंबाला न देता पोलिसांनीच या मुलीवर अंत्यसंस्कार केल्याने युपी सरकार आरोपींच्या पाठीशी असल्याचा आरोपही रामभाऊ जाधव यांनी केला.

Leave a Reply

%d bloggers like this: