जेसीबी ग्रुपच्या भारतातीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदी दीपक शेट्टी
जेसीबी ग्रुपने आज जेसीबी इंडिया लिमिटेडच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदावर दीपक शेट्टी (वय ४८) यांच्या नियुक्तीची घोषणा केली. दीपक गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून जेसीबीमध्ये नेतृत्वाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. भारत व दक्षिण आशिया विभागासाठी विक्री, मार्केटिंग, उत्पादन सहाय्य आणि व्यवसाय विकास आदी विभागांचे कार्यकारी उपाध्यक्ष या भूमिकेतून त्यांनी हे स्थित्यंतर केले आहे. या पदाची जबाबदारी त्यांच्यावर दोन वर्षे होती. त्यापूर्वी ४ वर्षे ते यूकेमध्ये जेसीबीच्या जागतिक एक्सकॅव्हेटर व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक होते.
पुढील वर्षी सुबीर कुमार चौधरी (वय ६१) यांच्याकडून दीपक व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतील. चौधरी यांनी जेसीबी इंडियासोबत सुमारे १५ वर्षे काम केल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. जेसीबी इंडियाच्या एका कारखान्यापासून पाच कारखान्यांच्या वाढीच्या प्रवासात सुबीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दीपक यांच्या नियुक्तीविषयी जेसीबी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रॅमे मॅकडोनाल्ड म्हणाले: “आमच्या समूहासाठी भारत ही सातत्याने महत्त्वपूर्ण बाजारपेठ राहिली आहे. आमच्या वारसा नियोजनाचा (सक्सेशन प्लानिंग) भाग म्हणून दीपक यांची या आव्हानात्मक भूमिकेसाठी नियुक्ती करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारत आणि यूकेमध्ये त्यांनी निभावलेल्या अनेक भूमिकांतून त्यांना मिळालेला अनुभव जेसीबी इंडियाला भारतातील बांधकाम उपकरण बाजारपेठेत अधिक भक्कम व शाश्वत स्थान प्राप्त करण्यास मदत करेल. जेसीबी ग्रुपच्या वतीने मी सुबीर यांना या वर्षाखेरीस ते घेत असलेल्या निवृत्तीसाठी शुभेच्छा देतो.”
