Monday, June 22, 2026
BLOG

इतिहासपुत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज ९९व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्या निमित्ताने…

‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते अटकर कोट , अटकर जाकिटातले, हिमसफेद दाढी आणि मानेवर रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जटा सांभाळत हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. त्यांच्याशी संवाद साधत असताना जणू एखाद्या ऋषीबरोबर भेट होते आहे असे वाटते. ‘शिवाजी महाराज’ हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहिरांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या साह्याने ‘वन्ही तो चेतवावा । चेतविता चेततो।’ या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले आणि त्यातून ऐतिहासिक जाणिवांनी बहरलेले राष्ट्रभक्तीचे मळे उभे राहिले. त्यांच्या प्रेरणेने असंख्य शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. अनेक अभ्यासक आणि संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. हुंदडणारी उत्साही तरुण मुले भक्तिभावाने गडकोटांच्या भेटीला जाऊ लागली. बाबासाहेबांसमवेत रानवाटा शोधत तो तेजस्वी इतिहास समजावून घेऊ लागली. शिवचरित्राच्या अभ्यासाचे, संशोधनाचे, श्रवणाचे, दर्शनाचे, अध्यापनाचे एक नवे पर्व सुरू झाले. सनावळी आणि दप्तरांमधला इतिहास शिवशाहिरांनी ललितरम्य पद्धतीने अनेक पिढ्यांना ऐकवला. वाणी नव्हे खङ्गधार। की विजेचा लोळ चर्रर्र। करी शिवसृष्टीचा उच्चार। जणू घन गडगडती।। अशी बाबासाहेबांची तेजस्वी वाणी आहे. हा व्रतस्थ शिवप्रेमी आणि असंख्य शिवप्रेमींचा गुरू. त्यांचे जीवनही तितकेच तेजस्वी .

‘छत्रपती शिवाजी महाराज’ लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. सहाव्या वर्षांपासून वडिलांच्याबरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, कधी बैलगाडीपासून ते घोडेस्वारीपर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. रात्ररात्र दप्तरं चाळून शिवचरित्राची सामग्री मिळवली. शिवचरित्र लिहून तयार झाले, पण ते प्रकाशित करण्यासाठी जवळ पैसे नव्हते. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला नव्हता. मग शिवचरित्र प्रकाशित करण्यासाठी पैसे जमवायला बाबासाहेबांनी मुंबईच्या भाजीबाजारात कोथिंबीरही विकली. या शिवगाथेची वाचकांनी अक्षरशः पारायणे केली. या शिवचरित्राचे कौतुक करताना आचार्य अत्रेंनी मराठातल्या अग्रलेखात लिहिले “हे शिवचरित्र साऱ्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेऊन घरभर नाचत सुटावे, इतके सुंदर झाले आहे. हे शिवचरित्र गद्य आहे की, काव्य आहे, इतिहास आहे की नाट्य आहे, याचा शब्दागणिक भ्रम पडतो. ते वाचताना मराठी भाषा इतिहासाची दासी बनली आहे की इतिहास मराठी भाषेच्या पायावर लोळण घेतो आहे, हे समजत नाही. हे अमर शिवचरित्र कालिदासाच्या कल्पनेने आणि भवभूतीच्या भावनेने लिहिणारा एक महाकवी, हे अमर शिवनाट्य शेक्सपीअरच्या ज्वलंत भावनेने लिहिणारा महान नाटककार या महाराष्ट्रात जन्माला यावा हे केवढे मोठे भाग्य ! ”

. ‘गीत रामायणा’ ने झपाटलेले शिवशाहीर एके दिवशी खांद्याला झोळी अडकवून थेट ‘पंचवटी’ या ग. दि. माडगूळकरांच्या निवासस्थानी गेले. बाबासाहेब गदिमाना म्हणाले, ‘याचकास मालकांच्या हातून भिक्षा हवी आहे.’ गदिमा बाहेर आले. त्यांना काही उलगडा होईना. तेव्हा शिवशाहीर म्हणाले, ‘आधी दान द्या. तुम्हीच देऊ शकाल, असं दान मागतोय. नाही म्हणू नका.’ गदिमा तयार झाले. शिवशाहिरांनी दान मागितलं, ‘गीत रामायणासारखं गीत शिवायन लिहीन, असं वचन द्या.’ गदिमांनी वचन दिले पण नियतीने ते पुरे होऊ दिले नाही.

‘शिवप्रेम’ हाच शिवशाहिरांशी स्नेह जोडण्याचा मजबूत धागा आहे. आजही तरुण मुले किल्ले पाहायला निघतात, तेव्हा ही वार्ता ते बाबासाहेबांना पत्राने कळवतात. बाबासाहेब मग त्यांना आशीर्वाद लिहितात, ‘आपण छोट्या चित्त्यांची चपळसेना घेऊन गडकोटांची आणि दऱ्याकपाऱ्यांची मोहीम करीत आहात. मनसुबा बहुतच उत्तम आहे. किल्ले पुरंदरापासून तख्तनशील रायगडापावेतो आपले चित्ते झेप घेणार आहेत. या गडकोटांचा इलाखा बहुतच बेनझीर आहे. तेथील तटाबुरुजांचा तर इतिहास ऐसा की काळीज धुंद व्हावे. बारकाईने बघा. थोरले महाराज छत्रपतीसाहेबांची चरितकहाणी याच रानावनात फुलली. इथेच नौबती झडल्या. इथेच पोवाडे दणाणले. इथेच गुप्त कारस्थाने कुजबुजली. ती सारी लक्षात घ्या. मनात साठवा. तेव्हाच आपली मोहीम फत्ते होईल. पण आपण वाऱ्यासारख्या भळाळणाऱ्या या उत्साहाला कृतीने नवा आकार द्याल, तेव्हाच त्याची सार्थकता ठरेल. प्रत्येक गडाचा बुरुज तुम्हाला म्हणेल, ‘तुम्ही वेडे व्हा! बेचैन व्हा! बेभान व्हा! हाच या मोहिमेचा उद्देश आहे. बहुत काय लिहावे ? फत्ते पावाल हाच शुभाशीर्वाद.’
बाबासाहेबांनी गमतीने एका मुलाखतीत सांगितले , ‘मला तीन गोष्टींचा अतिशय कंटाळा आहे. एक दाढी करण्याचा, दुसरा झोपेतून उठल्यानंतर अंथरुण गोळा करण्यचा आणि तिसरा व्याख्याने देण्याचा. पहिल्या दोन प्रकारांतून मी माझी सुटका करून घेतली, पण तिसरी गोष्ट वयाच्या आठव्या वर्षापासून माझ्या मानगुटीवर जी बसली. तिने आजपर्यंत माझी पाठ सोडलेली नाही, ती गोष्ट म्हणजे व्याख्यान देणे.’’
गोष्टी सांगण्यांची ही कला बाबासाहेब शिकले ते त्यांच्या वडिलांकडूनच. त्यांच्या वडिलांचे बोलणे तिखट असले तरी ते मुलांशी खूप प्रेमळपणे वागत. त्यांचे वाचन अफाट होते. इतिहासातल्या, पुराणातल्या, रामायण-महाभारतातल्या कितीतरी गोष्टी त्यांचे वडील त्यांना सांगत. नाटके पाहण्यासाठी ते मुलांना बरोबर घेऊन जात. बाबासाहेबांच्या वडिलांचे पाठांतर उत्तम होते आणि कथनशैलीही सुरेख होती. रोज एकतरी गोष्ट ते बाबासाहेबांना सांगत. बाबासाहेबांच्या आईला ते थोरले श्रीमंत आणि बाबासाहेबांना धाकटे श्रीमंत म्हणत. बाबासाहेबांच्या कथनशैलीवर त्यांच्या वडिलांचा खूप प्रभाव पडला. बाबासाहेब म्हणतात, “माझे आईवर शंभर टक्के प्रेम आहे आणि वडिलांवर एकशेएक टक्के प्रेम आहे.’’ मोलाचे सांस्कृतिक धन बाबासाहेबांना लहान वयातच मिळाले. त्यातून लेखनाची, काव्यरचनेची आणि अभिनयकलांची वाढ आणि जोपासना झाली.
बाबासाहेबांनी आयुष्यातले पहिले भाषण वयाच्या आठव्या वर्षी केले. ताथवडे हे त्यांचे आजोळ, तिथे नृसिंहाचे सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरात नृसिंह जयंतीचा उत्सव साजरा व्हायचा तो थाटामाटात. त्या उत्सवासाठी बाबासाहेब आईबरोबर मामांकडे जायचे. नृसिंहजयंतीच्या दिवशी एका कीर्तनकाराचे नृसिंह अवतारावर सुंदर कीर्तन व्हायचे. त्या कीर्तनकाराला त्या वेळी दोन रुपये बिदागी मिळायची. त्या दोन रुपयांतूनच त्याने पेटी आणि तबला वाजविणार्‍या कलाकारांची बिदागी द्यायची, असा सगळा मामला असायचा. त्या वर्षी गंमतच घडली. नृसिंहजन्माची वेळ जवळ आली तरी कीर्तनकाराचा पत्ता नव्हता. सगळे लोक अस्वस्थ होते. मामांच्या जिवाची घालमेल सुरु होती. कारण त्या उत्सवाचे यजमानपद त्यांच्याकडे होते. त्यांच्या इभ्रतीला साजेसा उत्सव त्यांनी आजवर केला होता. हाफचड्डी आणि शर्ट घातलेले पोरसवदा बाबासाहेब हे सारे पाहत होते. त्यांचे मामा त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “तुला नृसिंहजन्माची गोष्ट माहीत आहे ना? ती तू सांग.’’
बाबासाहेब गडबडलेच, कारण त्यांना नुसती गोष्ट येत होती. कीर्तनकार जसे पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागात कीर्तन करीत, तसे त्यांना जमणे शक्य नव्हते. आपला आवाज चांगला नाही, तालाचे आणि वाद्याचे ज्ञान नाही असे त्यांना वाटत होते त्यामुळे कीर्तनकारासारखी गोष्ट कशी सांगायची? असा प्रश्‍न बाबासाहेबांना पडला होता. ते काकुळतीला येऊन मामांना म्हणाले, “मला नाही त्या कीर्तनकारासारखी गोष्ट सांगता येणार!’’
धीर देत मामा म्हणाले, “तुला जशी गोष्ट सांगता येते तशी ती तू सांग. त्या कीर्तनकाराप्रमाणेच सांगितली पाहिजे असा आग्रह नाही.’’ इतर लोकांनीही त्यांना खूप आग्रह केला. प्रोत्साहन दिले. मनाची हिंमत करून बाबासाहेब उठले. त्यांनी साभिनय नृसिंहजन्माची गोष्ट सांगितली. लोकांना ती खूप आवडली. लोकांनी अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट केला. ते बाबासाहेबांचे पहिले जाहीर भाषण. खांबातून प्रकटलेल्या नृसिंहाने प्रल्हादाचा छळ करणार्‍या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन स्वतःच्या नखांनी त्याचे पोट फाडले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. हा प्रसंग बाबासाहेबांनी इतक्या तन्मयतेने सांगितला. की लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. हा प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाचा बाहेर काढलेला कोथळा यात बाबासाहेबांना खूप साम्य जाणवले. या प्रसंगाने शिवचरित्र व्याख्यानरुपाने कथन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
पुढे बाबासाहेबांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांचे शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान झाले ते नागपूरला. ती तारीख होती 25 डिसेंबर 1954. बाबासाहेबांची एक बहिण नागपूरला होती. ती बाबासाहेबांना म्हणाली, “बाबासाहेब, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करताय. एक व्याख्यान नागपूरला द्या.’’ बाबासाहेब नाही म्हणण्याच्या तयारीत असताना त्या म्हणाल्या, “तुम्ही नाही म्हणालात तर लोक काय म्हणतील? बहिणीचे भावावर काहीच वजन नाही.’’ त्या असं बोलल्यामुळे बाबासाहेबांना नकार देणे अवघड झाले. त्यांच्या बहिणीचे भगिनी मंडळ होते. ते मंडळ आणि नागपुरातील सीताबर्डी भागातील राजाराम सीताराम लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने ते व्याख्यान झाले. ते बाबासाहेबांचे पहिले जाहीर भाषण. शिवचरित्रावरच्या त्या भाषणाला शंभर एक लोक उपस्थित होते. लोकांना शिवचरित्र ऐकायला खूप आवडते, याचा त्या दिवशी बाबासाहेबांना प्रत्यय आला आणि शिवचरित्रकथन हा त्यांचा ध्यास आणि श्‍वास बनला. गेली ६६ वर्षे अव्याहतपणे बाबासाहेब व्याख्यानातून शिवचरित्र सांगत आहेत. देशाच्या सीमा ओलांडून बाबासाहेबांची परदेशातही व्याख्याने झाली. अमेरिकेत एकेका दिवशी त्यांची पाच व्याख्यांने झाली. आज वयाची ९८ वर्षे पार केलेली तरी बाबासाहेबांची शिवशाहिरी त्याच जोमात सुरु आहे.सर्व नाट्यविषयक संकल्पनाना ओलांडून जाणारे आणि सम्पूर्ण शिवचरित्र नाट्यरूपाने मांडणारे ‘जाणता राजा’ हे बाबासाहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले महानाट्य गेली पस्तीस वर्षे देशात आणि परदेशात गाजत आहे. दोनशेहून अधिक कलाकार, पाच मजली भव्य रंगमंच,हत्ती, घोडे, उंट, बैलगाड्यांसह होणाऱ्या या अपूर्व प्रयोगाने इतिहासाचे रोमांचकारी दर्शन घडविण्याबरोबरच नवा इतिहास निर्माण केला आहे

इतिहासाकडून नेमकं काय शिकायचं याची संथा शिवशाहीर देतात. अव्यभिचारी जीवननिष्ठा, घोर तपश्चरण, सातत्य आणि वक्तशीरपणा या सूत्रातले शिवशाहिरांचे जीवन हीच एक मूर्तिमंत गाथा आहे.

‘बेचैन जगा आणि चैनीत मरा’ हा वडिलांनी दिलेला मंत्र आजही बाबासाहेब प्राणपणाने जपत आहेत. व्यासंग हीच त्यांची विश्रांती. वेळेबाबत ते तत्पर. अकारण कोणीही वेळ वाया घालवू नये यासाठी’ कामे पडली अनंत। वेळ मात्र मर्यादित। म्हणोनि व्यर्थ गप्पांत। कालक्षेप न की जे।। असा सुविचार त्यांनी घरात लावला आहे. ऐतिहासिक भांडी, शस्त्रे, महाराजांची प्रतिमा आणि पालखी असलेल्या बाबासाहेबांच्या खोलीत गेले की, धन्य वाटते. हा इतिहासपुत्र कमालीचा हळवा आहे. पीडितांना पाहून कळवळणाऱ्या शिवशाहिरांची कळवळ मुकी नसते. तिला मदतीचे हात असतात. शिकण्याची अनिवार ओढ असलेली नानाविध जातिधर्माची मुले पुरंदरे वाड्यात राहून शिकली. समाजाला ते सतत देत राहिले. आदब तर त्यांच्या नसानसात भिनली आहे.एखाद्या चिमुरडीला देखील ते ताईसाहेब म्हणून हाक मारतात.

बाबासाहेबांचा गौरव करताना प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले होते, ‘बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावं तर तिचं कार्य महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. संस्था म्हणावे तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे. बाबा म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साक्षात सर्वज्ञता! पण या सर्वज्ञतेने पांडित्याची वस्त्रे नाकारली. डफावर थाप देऊन देश जागविणाऱ्या शाहिरीची वसनं तिने पसंत केली. परमपवित्र अशा सगुण चरित्राची शाहिरी करावी ती बाबांनीच. शाबास, शाहिरा शाबास! इतिहासानंसुद्धा तुला मुजरा करावा इतका मोठा माणूस तू ! या सत्त्वहीन, तत्त्वहीन जगात शिवचरित्राचा जागर करीत रहा. तुझ्या जागरणाला महाराष्ट्रातील सारी दैवतं जातीने हजर राहतील आणि तुझ्या शिवकथेत न्हालेला हा महाराष्ट्र तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडवील आणि खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंदभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करील. हे घडावे यासाठी हे इतिहासपुरुषा, शतायुषी हो!

‘प्राचार्यांचे शब्द खरे ठरण्याच्या क्षणाची महाराष्ट्र वाट आतुरतेने वाट पाहतो आहे.

– प्रा. मिलिंद जोशी ( लेखक सुप्रसिद्ध व्याख्याने आणि साहित्यिक आहेत)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading