पुण्यातील लाॅकडाऊनचा निर्णय एकतर्फी नाही- अजित पवार
पुणे, दि. 11 – पुण्याच्या लॉकडाउनसंदर्भात मी घेतलेला निर्णय हा एकतर्फी नाही तर व्यापक लोकहित व प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचा विचार करुनच हा निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
लॉकडाउनचा निर्णय घेताना पुणे शहरातील सध्याची परिस्थिती, कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या, लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन न करणे, तसेच प्रशासनाकडूनही आलेल्या सूचना या गोष्टींचा व्यापक विचार केलेला आहे. हा निर्णय कोरोनावर मात करण्याच्या उद्देशानेच घेतला आहे, त्या मुळे त्यात एकतर्फी काही असायचे कारण नाही.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची सरकारला आवश्यकता आहे. राज्य सरकार म्हणून आम्हीही सर्व बाजूंचाच विचार नेहमी करत असतो, मात्र हे करताना व्यापक जनहिताला प्राधान्य द्यावे लागते, प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिका-यांनाही याची कल्पना होती.
दूरध्वनीवरुन जे लोकप्रतिनिधी उपलब्ध झाले, त्यांनाही याची कल्पना दिली होती, त्यात पुण्याच्या महापौरांनाही याची माहिती दिली होती,असे पवार यांनी सांगितले.
केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक देशांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनसारख्या उपाययोजना अमलात आणल्या आहेत, त्यामुळे त्याचाच अवलंब देशातही अनेक राज्ये करीत आहेत. आर्थिक स्तरावर अनेकांचे नुकसान होत आहे, याची जाणीव आहे, मात्र तरीही लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, असेही उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांनी नमूद केले आहे.
