‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून -उपमुख्यमंत्री अजित पवार
शासनाकडून गंभीर दखल, शांतता, संयम पाळण्याचे आवाहन

मुंबई, दि.8 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 7, 2020
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करून घटनेचा निषेध नोंदवला तसेच तपास तत्परतेने करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
