गरिबांसाठी मोफत अन्न योजनेची जनजागृती करण्याचे आवाहन
लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे, दि. 8 – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पाच महिन्याच्या मोफत केलेल्या धान्याच्या वाटपासाठी उपाययोजनांची जनजागृती करून लाभार्थीना घरपोच धान्य अथवा जवळच्या सेंटर मधून धान्य वाटप करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आज हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट, प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे,प्रवक्ते के.सी.पवार, रमेश शेळके यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

टाळेबंदीच्या काळात या योजनेअंतर्गत तीन महिने लाभधारकांना ही योजना योग्य पध्दतीने न समजल्याने व त्याची लॉकडाऊन काळात जनजागृती न झाल्याने धान्य वाटपात मोठया प्रमाणात अनियमितता व काळाबाजार झाल्याची चर्चा आहे. रेशनकार्ड धारक आणि दुकानदार यांच्यामधील उडालेले खटके यामुळे ही योजना राबविण्याच्या पद्धती बाबत संशय बळावतो आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्राच्या निर्देशाप्रमाणे पुढील पाच महिने मोफत धान्य वितरणासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली लाभधारकांना घरपोच योजना राबवावी. अथवा प्रत्येक विभागात धान्याचे सेंटर उभी करावीत.हे सेंटर परिमंडळातील प्रत्येक विभागतील शाळेमध्ये सिसिटीव्हीच्या निगराणीखाली उभारावे. रेशनिंग कार्ड पाहुन त्याची योग्य ती नोंद केल्याची पावती देवून ही योजना राबवावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ही योजना पारदर्शक पध्दतीने राबविली जाईल.कोणत्याही प्रकारच्या काळाबाजारास वाव देऊ नये.
या योजनेच्या अमंलबजावणीवर सामाजिक कार्यकर्तेही आपआपल्या परीने सहकार्य करतील. या योजनेचा गरजूंना लाभ होवून कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहणार नाहीत, अशी काळजी घ्यावी, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.
