fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

महावितरणमधील तंत्रज्ञांच्या सात हजार पदांसाठी उमेदवारांची निवड येत्या आठवड्यात होणार

ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांचे आदेश

मुंबई, दि. 24 – महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या सात हजार जागांची भरती प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढील आठवड्यात या सर्व पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याचे आदेश महावितरणला दिले आहे. यामुळे प्रलंबित निवड प्रक्रीयेतील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरण कंपनीमध्ये जुलै 2019 मध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या 2 हजार आणि विद्युत सहाय्यक पदाच्या 5 हजार अशा एकूण 7 हजार पदांच्या सरळसेवा भरतीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये 25 अॉगस्ट 2019 रोजी उपकेंद्र सहाय्यक पदासाठी आयबीपीएस या संस्थेकडून परीक्षा घेण्यात आली आहे. तर विद्युत सहाय्यक पदासाठी परीक्षा न घेता केवळ दहावीच्या गुणानुक्रमानुसार निवड करण्यात येते. त्यानंतर या दोन्ही पदाच्या 7 हजार जागांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया प्रलंबित आहे. राज्यातील सुमारे दीड लाख आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या सात हजार जागांसाठी अर्ज भरलेले आहेत. मात्र गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याने उमेदवारांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व इतर वरिष्ठ संचालकांशी या प्रलंबित भरती प्रक्रियेबाबत नुकतीच चर्चा केली. त्यानंतर येत्या आठवड्याभरात विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या 7 हजार जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या आदेशामुळे या निर्णयामुळे राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून महावितरणमधील प्रलंबित भरती प्रक्रिया देखील पूर्ण होणार आहे. तसेच ग्राहकसेवेसाठी तब्बल 7 हजार कर्मचाऱ्यांची आणखी भर पडणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading