‘लॉ ऑफ लव्ह” च्या मोशन पोस्टरची दमदार एन्ट्री
“लॉ ऑफ लव्ह” चित्रपटाचे निर्माता आणि पटकथाकार जे. उदय यांच्या या पहिल्या वहिल्या प्रयत्नाबाबत चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच लॉंच झालेलं हे मोशन पोस्टर बरंच काही सांगून जातं. गुलाबी रंगाच्या बदामी आकारात एकत्रित जमा झालेली भरपूरशी फुलपाखरं अनेक प्रेमी युगुलांप्रमाणे त्यांचं निरागस प्रेम फुलवताना दिसतात. त्यांच्यावर अचानक भिरकावलेला खडा क्षणार्धात सगळं काही विखरून टाकतो आणि पाखरं जिकडे तिकडे सैरभैर उडू लागतात. गोड प्रेमी जोडप्यांची अनेक बाबतीत समाजकंटकांकडून अशी परवड होत असली तरीही फुलपाखरांची एक जोडी नेटाने कोर्टाचं दार ठोठावते. आपलं खरं प्रेम जिंकण्यासाठी आणि शेवट पर्यंत तडीस नेण्यासाठी या जोडीचा प्रयत्न ”लॉ ऑफ लव्ह” सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये ठळक दिसतो. त्यांची ही व्यथा समाज आणि कायद्याच्या चौकटीत बसते का? प्रेमाला स्वतःचं अस्तित्व मिळविण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आजही लढा द्यावा लागत आहे का? यासारख्या अनेक गोष्टींची उकल सिनेमात पाहायला मिळणार आहे.
संपूर्ण अनलॉक झाल्या नंतर प्रेक्षकांच्या बदललेल्या चवीसाठी हा सिनेमा उत्तम पर्याय ठरणार आहे. या सिनेमात नक्की कोण कोणते कलाकार असणार आहेत, कोणत्या नव्या गोष्टी असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यात आहे, त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकचं राहील. याबाबत निर्माता आणि पटकथाकार जे. उदय म्हणतात, “प्रेमाची नवी व्याख्या मांडणारा हा सिनेमा प्रेक्षकांना लार्जर दॅन लाईफ अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. असा हा लॉ ऑफ लव्ह सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहोत.”