घरकामगार महिलांना सोसायट्यांनी दिलासा द्यावा – अमित बागुल
पुणे, दि. 12 – जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आज खबरदारी घेत आहे. लॉक डाऊनच्या कडक अंमलबजावणीला गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वचजण सामोरे गेले . आज प्रादुर्भाव कमी होत आहे आणि प्रशासनाने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी शिथिलता दिली आहे ;पण घरकामगार महिलाच त्यापासून वंचित राहत असल्याने, ते त्यांच्या कोलमडलेल्या संसाराला कसे सावरणार या गंभीर वास्तवतेकडे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते अमित बागुल यांनी लक्ष वेधले असून प्रशासनाने याप्रश्नी तोडगा काढावा असे आवाहनही केले आहे.
याबाबत अमित बागुल म्हणाले कि, कोरोनाचा प्रादुर्भाव आज कमी होत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. सॅनिटायझर, मास्क आणि सामाजिक अंतर या महत्वपूर्ण बाबींचा अवलंब प्रत्येक जण करत दैनंदिन कामकाजाला सुरुवातही केली आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या अनेक घरकामगार महिलांना अजूनही बहुतांश सोसायट्यांमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. गेले दोन – अडीच महिने लॉकडाऊनमुळे उत्पनाअभावी घरकामगार महिलांना आज घर कसे चालवावे या प्रश्नाने घेरले आहे. त्यात गेली दहा -पंधरा वर्षे ज्यांच्याकडे काम केले ,त्यांनीच आता कोरोनाच्या भीतीने पाठ फिरवली आहे मग जगायचे कसे असा सवाल या घर कामगार महिलांचा आहे. आम्हालाही सुरक्षितता महत्वाची आहे, आम्हालाही कुटुंब आहे मग कोरोनाविषयी दक्षता आम्हीही घेत आहोत . असे असतानाही आज अनेक सोसायट्यांमध्ये आम्हाला प्रवेश नाकारला जात आहे मग आमच्या रोजीरोटीचे काय असा प्रश्न घरकामगार महिला उपस्थित करत आहेत असेही अमित बागुल यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, आज पुण्यात घर कामगार महिलांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सोसायट्यांनी या घरकामगार महिलांचा विचार करावा,त्यांना कामापासून वंचित ठेवू नये. घर काम करणाऱ्या महिला ह्या आपल्या कुटूंबातील एक सदस्य असल्या प्रमाणे त्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे
माझी सर्व सोसायटी सभासद आणि कमिटीला हात जोडून विनंती आहे आपण घर काम करणाऱ्या महिलांना कामावर घ्या त्यांना कामावरून काढू नये आता खरी माणुसकीची गरज आहे आपण नक्की या सगळ्या गोष्टींचा विचार करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो