बंधपत्रित अधिपरिचारीकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

मुंबई दि. 09 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारीकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने सेवेत सामावून घेण्यात यावे.  कोविड-19 साथरोग तसेच अन्य आरोग्य सुविधांच्या बाबतीत अधिपरीचारीकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. बंधपत्रित अधिपरीचारीकांपैकी अनेकांनी शासकीय सेवेतील प्रवेशाची वयोमर्यादा ओलांडली आहे.  त्यांना अचानक सेवेतून कमी करणे उचित नाही, यादृष्टीने सहानुभूतीपूर्वक धोरण आखणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

आज विधान भवन, मुंबई येथे नागपूर विभागातील बंधपत्रित अधिपरिचारीकांच्या सेवा समस्यांसदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यात यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये या अधिपरिचारीकांना सेवेत कायम करण्यात आले तर काही जिल्ह्यामध्ये असे झाले नाही. ही उणिव दूर व्हावी आणि नागपूर विभागात भंडारा, गोंदिया जिल्हयात यापुढील भरतीप्रसंगी अशा अधिपरिचारीकांना प्राधान्याने कायम करण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी दिले आहेत. या बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त अनुपकुमार यादव व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

%d bloggers like this: