fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागात महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरु

पुणे, दि. 8 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 240 वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता येत्या काही दिवसांत उर्वरित वीजबिल भरणा केंद्र सुरु होणार आहेत.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणचे पुणे परिमंडलातील वीजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. तसेच 23 मार्चपासून मीटर रिडींग व छपाई केलेल्या कागदी वीजबिलांचे वितरण बंद करण्यात आले. त्यामुळे वीजग्राहकांना मासिक वीजवापराएवढे सरासरी वीजबिल मोबाईल ‘एसएमएस’द्वारे तसेच अॉनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे. वीजग्राहकांना पाठविण्यात आलेले सरासरी वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वीजग्राहक व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपात आरोग्याची काळजी घेऊन वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाकडून महावितरणला देण्यात आली आहे. ही काळजी घेऊन महावितरणने पुणे शहरातील 207 पैकी 54, पिंपरी चिंचवड शहरातील 96 पैकी 46 आणि मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, मुळशी, वेल्हे या तालुक्यांमध्ये 239 पैकी 140 वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये महावितरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच इतर सहकारी बँका व पतसंस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये वीजबिल भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कर्मचारी व वीजग्राहक यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे नियम पाळणे तसेच सॅनिटाईजरची सोय उपलब्ध करून देणेबाबत केंद्रचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वीजग्राहकांना पाठविण्यात आलेल्या मोबाईल ‘एसएमएस’द्वारे किंवा केवळ ग्राहक क्रमांकाच्या आधारे वीजबिल भरून घेण्याची सूचना केंद्रचालकांना देण्यात आली आहे. वीजग्राहकांनी वीजबिल उपलब्ध नसल्याने वीजबिल भरणा केंद्रात ‘एसएमएस’ दाखवावा किंवा जुने वीजबिल दाखवावे. ते सुद्धा उपलब्ध नसल्यास फक्त ग्राहक क्रमांक सांगितला तरी वीजबिलाची रक्कम भरण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यासोबतच घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी महावितरणची वेबसाईट http://www.mahadiscom.in तसेच मोबाईल अॅप व इतर पर्यायांद्वारे आॅनलाईन सोय उपलब्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: