fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

कोरोना, लॉकडाऊन – गावाच्या सेवेसाठी वकीलाने महिनाभर चालवली गिरणी !

पुणे, दि. ५  – लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवांना परवानगी असली तरी करोनाच्या भीतीने अनेक सेवा पुरवठादार आपली सेवा पुरवीत नसल्याने, नागरिकांची गैरसोय होत होती . या पार्श्वभूमीवर मोहाट (ता .जावळी ) येथील पिठाची गिरणी चालू ठेवण्यासाठी येथील पेशाने वकील असलेल्या अँड.अनिल देशमुख यांनी महिनाभर गावकऱ्यांना स्वतः पीठ दळून देऊन, भात कांडणी करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला.या सेवेबद्दल पुण्यातील जावळी तालुका मित्र मंडळ आणि शिवप्रदेश प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
प्रतिष्टान च्या वतीने जब्बार पठाण ,राजू नलवडे,संजय शेलार ,विनोद पार्टे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. करोनाच्या संसर्गामुळे जावळीत पहिला करोनाचा रुग्ण निझरे येथे सापडला. त्यानंतर तालुक्यातील बहुतेक सर्व व्यवहार, कामकाज ठप्प झाले.

लॉकडाउन असल्याने या भागातील अनेक व्यवहार बंद झाले. यातच येथील काही पिठाच्या गिरण्या , भात कांडप मशीन देखील बंद राहिल्याने नागरिकांना पीठ दळून मिळणे, भाताचे तांदूळ करून मिळणे अवघड होणार होते . नागरिकांची गैरसोय पाहता मूळचे मोहाट येथील रहिवासी असलेले साताऱ्यातील ॲडव्होकेट अनिल देशमुख यांनी घरची गिरणी स्वतः चालू करून आपल्या पदाचा, व्यवसायाचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता सेवा दिल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.लॉकडाऊन काळात रोज ४ ते ५ तास गिरणी चालवून तसेच गिरणीबरोबर शेतीची कामे करून सर्वांपुढे आदर्श ठेवला.

जावळी परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्याने अत्यावश्यक सेवांनादेखील निर्बंध आले होते . एकामागोमाग एक करोनाचा संसर्ग झाल्याने अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या अनेकांनी आपले व्यवसाय स्वतःहून बंद ठेवले. या भागात असणाऱ्या काही पिठाच्या गिरण्यादेखील बंद राहिल्या. त्यामुळे नागरिकांना आपले दळण दळण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित पिठाची गिरणी आहे.अनिल यांच्या मातोश्री श्रीमती कांताबाई शंकर देशमुख यांनीही गिरणी चालवून गावकऱ्यांना दिलासा दिला . मोहाट पंचक्रोशीतील ही पहिली गिरणी असून १९६० च्या दशकापासून अविरत सेवा देत आहे. देशमुख यांचे आजोबा संपतराव धनावडे पाटील यांनी भाताच्या पिकाचे उच्च्यांकी उत्पादन घेतल्याबाबत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यांना प्रगतिशील शेतकरी म्हणून गौरविले गेले होते. या सर्व पार्श्वभूमीवर अँडव्होकेट अनिल देशमुख आणि त्यांच्या मातोश्री कांताबाई शंकर देशमुख यांच्या सेवेचे जावळीत कौतुक होत आहे.
जिल्हा प्रवास बंदी उठल्यावर त्यांचा सत्कार पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: