ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण मानवजातीला दिली 9 शाश्वत तत्वे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे प्रतिपादनः
पुणे,दिः 3 – “संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाला अवध्या 16 व्या वर्षी अध्यात्मरूपी प्रकाश दिला. ओम नमो जी आद्या, एकम सत विप्राः बहुधा वदंति, न हि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, श्रध्दावान लभते ज्ञानम…, सत्य ज्ञानानंतं गगनाचे प्रावरण…, उपजे ते नाशे, नाशिले पुनरपि दिसे, धारयते इति धर्मः, क्रोधात भवति संमोहः.., शांतीपरते नाही सुख.. यासारखे 9 शाश्वत वैश्विक सिध्दांत त्यांनी जगासमोर मांडले. त्याचे आचरण केल्यास कोणत्याही समस्येला तोंड देता येईल.” असे प्रतिपादन संतश्री ज्ञानेश्वर गुरूकुलचे संस्थापक व तत्वज्ञ स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड लिखित ‘तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली मानवी जीवनाची 9 वैश्विक गुह्य सिध्दांतरूप तत्वे’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वामी गोविंददेव गिरी महाराज व पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी वेबिनारच्या माध्यमातून केले. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, प्र कुलगुरू प्रा.डॉ.मिलिंद पांडे आणि सीईओ प्रविण पाटील हे उपस्थित होते.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले,“ संत ज्ञानेश्वर यांनी सांगितलेली 9 तत्वे शाश्वत स्वरूपाची. ती सर्व भाषा, धर्म, संस्कृतीत अंतर्भूत आहेत. ज्ञानेश्वर हे केवळ तत्वज्ञानी नाहीत, तर एक ऋषीच आहेत. त्यांनी जगाला अमृत अनुभव दिलेला आहे. शुध्द ज्ञान, प्रेम आणि भक्ती यांचा सुंदर संगम त्यांनी घडवून आणला आहे. ज्योतीची निजज्योती म्हणजेच आत्मज्योती हे त्यांनी सांगितले.”
“धर्म हा व्यष्ठी आणि समष्ठ या तत्वावर आधारित असतो. प्रत्येकाला आंतरिक व बाह्य शांती हवी आहे. तेच सूत्र संतश्री ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महारांनी संपूर्ण जगाला दिलेले आहे. या पुस्तकामुळे समाजात विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाला चालना मिळेल.”
डॉ.विजय भटकर म्हणाले,“ डॉ. विश्वनाथ कराड यांनी लिहिले पुस्तक संपूर्ण जगाचे ज्ञान भंडार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आध्यात्मिक विचार मांडला. शास्त्रज्ञांनी जे वेगवेगळे तत्व मांडले आहेत ते ज्ञानेश्वरीच्या आधारावरच आहेत असे म्हणू शकतो. ज्ञानेश्वरांनी पारमार्थीक सत्य व आदी अनादी सत्य मांडले. परंतू आजचे युग डिजिटलाइजेशनचे असून त्याच्या आधारवरच संपूर्ण जग चाललेले आहे. अशा वेळी मानवाने प्रकृती, अध्यात्म आणि देवाला समजून घ्यावे. वरील पुस्तकात ज्या 9 तत्वांचा उल्लेख आहे, त्याचे अनुकरण सर्व मानवजातीने करावे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ ज्ञानेश्वरांनी जगातील अनेक गोष्टींचा उलगडा शब्दामध्ये केला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी 16 व्या वर्षी संपूर्ण विश्वाचे विश्लेषण करून ठेवले आहे. भारतामध्ये अंतिम सत्याचा शोध आणि जग हे चैतन्य स्वरूपाचे प्रकटीकरण होय अशी संकल्पना मांडली जाते. ज्ञानेश्वरीतील प्रथम वाक्य ओम नमो जी आद्या हे वाक्य जग हे चैतन्य रूपाचे प्रकटीकरण आहे, हे सांगते. हे विश्वची माझे घर असे सांगणारे ज्ञानेश्वर आणि वसुधैव कुटुम्बकमची संस्कृतीचे पालन करणारा भारत देश आजही मानवतेला प्राथमिकता देतो. जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये याची शिकवण भारतीय संस्कृतीत आहे.”
“ लॉकडाउनच्या काळात ज्ञानेश्वरीचे मंथन केल्यानंतर समाजासाठी आवश्यक अशी 9 तत्वे पुस्तक रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी मांडलेल्या विचारांवर आता संपूर्ण जगाने अनुकरण करण्याची वेळ आली आहे.”
प्रा. डी.पी. आपटे यांनी आभार मानले.