सॅनिटायझर यंत्र संशोधक राजेंद्र जाधव यांच्या संशोधनाची प्रधानमंत्री यांनी घेतली दखल
नाशिक दि. 31 – नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शेतकरी आणि व्यावसायिक असलेले राजेंद्र जाधव संशोधक आहेत, त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनोखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे कोरोनाच्या लढ्यासाठी मोठी मदत झाली झाली आहे व होणार आहे, त्यामुळे या उल्लेखनीय निर्मिती कार्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात संशोधकांचा गौरव केला आहे.
कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मेक इन इंडिया अंतर्गत संशोधित सॅनिटायझर मशीनमुळे कोरोना उच्चाटनाच्या युद्धात मोठे बळ मिळाले आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते संशोधक राजेंद्र जाधव यांच्या या शोधामुळे नाशिक जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि पोलीस यंत्रणेकडून कोरोना विरोधात लढा सुरू आहे. असे असले तरी रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कंपाऊंड गेट, भिंती आदींना माणसांचा स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही मार्गाने स्पर्श होणाऱ्या विविध जागांवर निर्जंतुकीकरण करून संसर्ग टाळणे शक्य आहे. हे आव्हानात्मक काम मनुष्यबळाची कमतरता असल्याने इच्छा असूनही होताना दिसून येत नाही. मात्र मनुष्यबळाचा वापर न करता झपाट्याने फैलावत असणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी संभाव्य संसर्गित जागांची तातडीने फवारणी करणे अत्यावश्यक ठरते. वऱ्हाणे ता. बागलाण येथील शेतकरी, संशोधक राजेंद्र जाधव यांनी त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणीसाठी यंत्र निर्मित केले होते. त्या यंत्राची उपयुक्तता तपासून कोरोना संकट काळात त्यांनी हे यंत्र सटाणा नगरपरिषदेला वापरासाठी दिले. ह्या यंत्रामुळे कोरोना निर्जंतुकीकरणाच्या लढाईला मोठे बळ मिळाले.

त्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी योगदान ठरलेल्या यंत्राची दखल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. प्रधानमंत्री यांनी संशोधक तथा शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या संशोधक कार्याचा गौरवास्पद उल्लेख केला. त्यामुळे यंत्रभूमी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कुशलता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. राजेंद्र जाधव यांनी केलेल्या या प्रयोगामुळे कोरोना संकटात निर्जंतुकीकरण मोहिमेला मोठा वेग आला आहे. भविष्यकाळात या यंत्रामुळे प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला खूप मोठा आधार मिळणार आहे. त्यांनी बनवलेल्या या यंत्रांचे नाव त्यांनी ‘यशवंत’ ठेवले असून त्यांच्या या यशवंत उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘यशवंत’ची रचना व निर्मितीची गाथा…
कोरोना विषाणूपासून बचाव कसा करता येऊ शकतो, याबाबतही खूप काही बोलले जात आहे. कोरोना विषाणूमुळे पायाभूत सुविधांबरोबरच सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले आहे. दुसऱ्या ठिकाणाहून कोरोनाग्रस्त व्यक्ती गावात आली, तर या विषाणूचा आपल्याही गावात प्रवेश होणार व इथल्या ग्रामस्थांनाही त्याची लागण होणार हे राजेंद्र जाधव यांच्याही लक्षात आले. जाधव यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्थानांची स्वच्छता करण्यासाठी स्व-अध्ययनातून एक यंत्र विकसित करता येईल का, याविषयी संशोधन सुरू केले. यासाठी त्यांनी शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीचा प्राधान्याने विचारपूर्वक वापर केला.

अवघ्या 25 दिवसांमध्ये राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरवर बसवता येवू शकेल, असा नाविन्यपूर्ण फवारा यंत्रणा विकसित केली.
या फवाऱ्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ॲल्युमिनीयमची दोन पाती बसवण्यात आली आहेत. दोन्ही पाती विरुद्ध दिशेने हवा शोषून घेतात व नोझल (छिद्र) मधून उच्च दाबाने निर्जंतुकीकरणाच्या द्रावाच्या तुषारांचे सिंचन सर्व दिशांना करतात. ही पाती 180 अंशाच्या कोनामध्ये फिरतात. तसेच जमिनीपासून 15 फूट उंचीपर्यंतच्या भिंतीचीही स्वच्छता करण्यास ती सक्षम आहेत. या फवाऱ्याद्वारे स्वच्छता, निर्जंतुकीकरणासाठी 15 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ शकतो.
या स्वच्छता यंत्रामध्ये एकावेळेस 600 लीटर जंतुनाशक मिश्रीत द्रावण टँकरमध्ये ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळे या फवाऱ्याने कुंपणाच्या भिंती, दारे यांची स्वच्छता करणे सोईचे आहे. या फवाऱ्याच्या मदतीने निर्जंतुकीकरणाच्या कामाचा आणखी एक फायदा म्हणजे, या कामामध्ये मानवी हस्तक्षेपाची फार कमी आवश्यकता भासते. त्यामुळे विषाणूंचा मानवाशी संपर्क येण्याची शक्यता खूप कमी आहे. फक्त एकच व्यक्ती म्हणजे, जी ट्रॅक्टर चालक आहे, ती व्यक्ती हे यंत्र संचलित करून संपूर्ण गावाची स्वच्छता करू शकते.
या यंत्राच्या विकासासाठी सुमारे 1.75 लाख रूपये खर्च आला आहे, असेही जाधव यांनी सांगितले. या फवाऱ्याचा वापर सटाणा नगरपालिकेच्यावतीने सटाणा गावात जवळपास 30 किलोमीटर क्षेत्रामध्ये स्वच्छता करण्यासाठी केला जात आहे.
ट्रॅक्टरवर बसवण्यात आलेल्या या फवारा यंत्राची उपयुक्तता लक्षात घेवून जाधव यांच्या धुळे जिल्ह्यातल्या एका मित्राने आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठीही असेच आणखी एक यंत्र तयार करण्याची विनंती केली. त्यांनी मित्रासाठी तयार केलेले यंत्र धुळे जिल्ह्यातील त्यांच्या गावी, स्वच्छतेसाठी पाठवण्यात आले आहे.
कोविड-19 वर विजय मिळवून देणारे हे अभिनव फवारणी यंत्र असल्याने राजेंद्र जाधव यांनी आपल्या या यंत्राला ‘यशवंत’ असे नाव दिले आहे. त्यांना आपल्या या अनोख्या फवाऱ्याच्या पेटंटसाठी म्हणजेच बौद्धिक स्वामित्वासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच (एनआयएफ) ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’कडेही त्याचे डिझाईन पाठवले आहे. कोरोना प्रसाराविरुद्धच्या लढाईमध्ये भारतातल्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षमतेचे दर्शन देणारे हे अभिनव यंत्र आहे.
Share this:
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on LinkedIn (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to email a link to a friend (Opens in new window)
- Click to print (Opens in new window)