तंबाखूचा अंमली पदार्थांच्या यादीत समावेश करा : डॉ. कल्याण गंगवाल
पुणे, दि. 31 – तंबाखूच्या सेवनामुळे भारतात दररोज जवळपास १० हजार लोक मृत्यूला सामोरे जात आहेत. हृदयरोग, कर्करोग, एड्स यापेक्षाही तंबाखूचे व्यसन अधिक घातक आहे. त्यामुळे विषवल्ली तंबाखूला समाजातून हद्दपार करण्यासाठी तंबाखूचा समावेश अंमली पदार्थांच्या यादीत करून त्यावर बंदी घालावी,” अशी मागणी शाकाहार व व्यसनमुक्ती कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.
३१ मे हा दिवस जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गेली ३० वर्षे तंबाखूमुक्त भारत आंदोलन राबवणारे सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकाद्वारे मागणी केली.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “तंबाखू शेतीवर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे. तरुण पिढीला तंबाखूमुक्त व व्यसनमुक्त करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणे गरजेचे आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांना आवाहन करतो की, सिगारेट, बिडी, जर्दा, मावा, गुटखा, मशेरी, तपकीर याचा वापर करू नये. तंबाखू विक्रेत्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये.”