कार्पोरेट फार्मिंग आणि मार्केटिंगच्या आधारावरच कृषी उद्योगाचा विकास शक्य – अविनाश सुर्वे आणि प्रदीप लोखंडे यांचे मत
पुणे, दि. 31 – कार्पोरेट फार्मिंग आणि मार्केटिंगच्या आधारावरच कृषी उद्योगाचा विकास शक्य असल्याचे मत अविनाश सुर्वे आणि प्रदीप लोखंडे यांनी ‘महाराष्ट्रातील कृषी विकास आणि आत्मनिर्भर भारतासाठी जिल्हा व तालुकास्तरावर कृषी विकासाच्या आणि पूरक उद्योगाच्या नवीन कल्पना’ या वेबिनार मध्ये मांडले.
विकास साधक वाहिनीचे उपाध्यक्ष विनीत कुबेर यांनी आयोजित केलेल्या या वेबिनार मध्ये पाटबंधारे विभागाचे निवृत्त सचिव आणि सध्या विदर्भ पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अविनाश सुर्वे यांनी विदर्भात उभ्या केलेल्या आधुनिक शेती प्रयोगांची आणि योजनांची माहिती दिली.
कृषी क्षेत्रात लहान शेतकर्यांची कुचंबणा होत असून काही जणांनी एकत्र येऊन सामूहिक शेतीचा पर्याय आणि त्याला योग्य बाजार भाव मिळून बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याशिवाय पुढील काळात शेती विकास होणार नाही. कार्पोरेट फार्मिंगच्या आधारावर जिल्ह्यामध्ये कृषी पूरक उद्योगांना प्राधान्य देण्याची गरज आहे. कोरोना महामारीनंतर मुंबई पुण्यातून आणि अन्य महानगरातून गावाकडे परत फिरलेले बहुतांश कामगार पुन्हा शहराकडे जाण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशावेळी स्थानिक पातळीवर उद्योग उभे करणे आणि तालुका तसेच जिल्हा आत्मनिर्भर बनविणे हीच काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोणताही व्यवसाय मार्केटिंग शिवाय यशस्वी होऊ शकत नाही, शेतकर्याने मी फक्त शेतमाल उत्पन्न करेन हे जर ठरवले तर शेती विकास अवघड होईल, असे या वेबिनारमध्ये बोलताना प्रदीप लोखंडे यांनी सांगितले. आपल्या मालाविषयी खात्री आणि उत्तम पॅकेजिंग या आधारावर मागू ती किंमत बाजारामध्ये मिळू शकते हे लोखंडे यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. महाराष्ट्रातील तरुणाला कमी त्रासात, कष्ट न करता अर्थप्राप्ती व्हावी असे वाटत राहिले तर पुन्हा परप्रांतीय कामगार प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतील आणि महाराष्ट्रातील खेड्यामधला तरुण फक्त स्थानिक राजकारणातच वेळ घालवेल. हे टाळायचे असेल तर आधुनिक शेती आणि व्यवसायांची माहिती तरुणांनी मिळवली पाहिजे. उत्तम मार्केटिंगची ओढ त्यांच्या आयुष्यात लावण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
या वेबिनार मध्ये भारतीय किसान संघाच्या अनेक पदाधिकार्यांनी तसेच राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रा. नानासाहेब जाधव, निवृत्त कुलगुरू वार्ष्णैय, डॉ. हेमंत बेडेकर, वैशाली घाडगे, डॉ. शरद गडाख तसेच किसन वीर साखर कारखान्याचे मदनदादा भोसले, देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजित कदम, भगवानराव थोरात, विलास सोनवणे, महेश पाटील इत्यादी मान्यवरांनी सहभाग घेतला.