Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

लॉकडाऊनच्या काळातही आंबा निर्यातीला मोठे यश; कोकणातील ८ हजार ६४० टन आंब्याची निर्यात

नवी मुंबई, दि. 26 :- लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असताना कोकणातील 8 हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत करण्यात आली.  1 एप्रिल ते 19 मे 2020 या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबु, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण 2 लाख 99 हजार 950 मे. टन मालाची निर्यात करण्यात आली आहे. 

राज्यात कोरोनाविरुध्द लढाई सुरु असताना शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या.  यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचे संकट दूर करण्यासाठी कृषि माल निर्यात सुरळीत ठेवण्यात यश आले. या परिस्थितीत कृषि विभागाने जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामार्फत भारतातील फळे व भाजीपाला समुद्र व हवाई मार्गाने जगभरात निर्यात केला. मागील दीड महिन्यात विविध देशांच्या मागणीनुसार फळे व भाजीपाल्यांची निर्यात करण्यात आली आहे. आंबा 8 हजार 640 मे.टन, केळी 33 हजार 948 मे. टन, द्राक्ष्‍ो 9 हजार 509 मे. टन, डाळिंब 1 हजार 773 मे. टन, कांदा 2 लाख 25 हजार 686 मे.टन,  लिंबु 653 मे.टन, मिरची 1 हजार 522 मे. टन, आले 1 हजार 168 मे. टन, इतर फळे व भाजीपाला 17 हजार 051 मे.टन  निर्यात करण्यात आले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत केळी, लिंबू, मिरची आणि आले याची निर्यात यावर्षी जास्त झालेली आहे. यामध्ये केळी गेल्या वर्षी 23 हजार 456 मे.टन तर यावर्षी 33 हजार 948 मे.टन निर्यात झाली आहे. म्हणजेच केळी निर्यात सुमारे दीडपट झालेली आहे. लिंबाची निर्यात गेल्या वर्षी 283 मे.टन होती. यावर्षी 653 मे.टन झाली आहे. मुंबईमधून गेल्यावर्षीच्या तुलनेत लिंबू निर्यात 230 टक्के झालेली आहे. हिरव्या मिरचीची निर्यात गेल्या वर्षी 1 हजार 409 मे.टन झाली होती. त्या तुलनेत यावर्षी 1 हजार 522 मे.टन म्हणजे सुमारे 113 मे.टन जास्त झाली आहे. तसेच आल्याच्या निर्यातीतही चांगली वाढ झालेली असून गेल्यावर्षी आले निर्यात  846 मे.टन होती. यावर्षी 1 हजार 168 मे.टन झालेली आहे.

मागील वर्षाच्या निर्यातीच्या तुलनेत यावर्षीची निर्यात कमी झालेली असली, तरी कोरोनाच्या संकटातील लॉकडाऊनच्या काळात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथून कंटेनर आणि ट्रेलरसाठी वाहनचालकांची कमतरता असतानाही तसेच वाहतुकीच्या वेळी रस्त्यांवर कोणत्याही जेवणाच्या तसेच वाहन दुरुस्तीच्या सुविधा नसतानाही निर्यातीसाठी फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देणे हे कौतुकास्पद आहे.  पुढील काळात या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येईल. त्यासाठी योग्य उपाययोजना व नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading