fbpx

टीईटी, शिष्यवृत्ती निकाल लांबणीवर पडण्याची शक्‍यता

पुणे – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून लॉकडाऊनही वाढवला आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालाचे कामकाज ठप्प आहे. आता लॉकडाऊन उठल्यानंतरच कामकाज पूर्ण करण्याचा पवित्रा संबंधित बड्या एजन्सीने घेतला आहे. यामुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल लांबणीवर पडणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 19 जानेवारी रोजी टीईटी तर, 16 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. टीईटीसाठी 3 लाख 43 हजार 283 उमेदवारांनी नोंदणी केली. या परीक्षेची अंतरिम व अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) उत्तीर्ण होण्यासाठी 5 टक्‍के सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी आतापर्यंत 7 हजार 400 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज व आवश्‍यक कागदपत्रे सादर केली. यातील 6 हजार 700 अर्ज पात्र तर 700 अर्ज अपात्र ठरले. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून अंतिम निकाल जाहीर करण्याचे काम अद्याप बाकी आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 9 लाख 71 हजार 764 विद्यार्थ्यांची नोंदणी शाळांनी केली होती. यात इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 74 हजार 372 तर, आठवीसाठी 3 लाख 97 हजार 392 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध केली होती. त्यावर प्रश्‍नपत्रिकामधील चुका व उत्तरसूची यावर ऑनलाइन आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. या आक्षेपांची विषय तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यासह इतर कामे रखडली आहेत. प्रश्‍नपत्रिका तयार करणाऱ्या विषय तज्ज्ञांकडून आक्षेपांची तपासणी करावी लागते. हे तज्ज्ञ विविध जिल्ह्यांतील आहेत. आक्षेपांची तपासणी व उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगचे काम ठप्प आहे. अंतिम उत्तरसूचीही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे या परीक्षेचा निकाल आता जूनऐवजी ऑगस्टमध्ये लागण्याची शक्‍यता आहे.

एकाच एजन्सीकडे दोन कामे
टीईटी, शिष्यवृत्ती या दोन्ही परीक्षा व निकालाचे कामकाज एकाच एजन्सीकडे आहे. परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी एजन्सीला तत्काळ परीक्षांच्या निकालाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, एजन्सीने लॉकडाऊन कालावधीत निकालाचे कामकाज करता येणार नाही, असे स्पष्ट कळवले आहे. एजन्सीचे कर्मचारी हे पुण्याबाहेरील आहेत. ते मार्चमध्येच आपआपल्या गावी निघून गेले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतरच ते परत येणार आहेत. त्यानंतरच निकालाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: