fbpx
Thursday, April 25, 2024
BLOG

आमरसाची गोडी, नामंवतांच्या सहवासात !

आमरस पुरी, कुरकुरीत पापड कुरडया,मसालेदार रस्सा भाजी आणि नव्या कैरीच्या करकरीत फोडींचे लोणचे . . . अ हा हा . . असा बेत म्हणजे अस्सल मराठी माणसाला मेजवानीच की हो !
आता हाच योग, आपल्या आवडत्या कलाकारांच्या पंगतीत लाभला तर . . ? हा आनंद, सुमारे पंचवीस वर्षे आम्ही अनुभवतो आहोत.कलाकार, साहित्यिक, खेळाडू,पत्रकार, लष्करी अधिकारी अशा अनेकांच्या आदरातिथ्याने आमचे घर पावन झाले आहे.


सद्यःस्थितीत, नुकताच, दिलीप प्रभावळकरांच्या घरी जेव्हा डबा देऊन आलो तेव्हा या रसभरित कालखंडाची, पुन्हा उजळणी झाली.
घरच्या रोजच्या स्वयंपाकामधे, तव्यावरची पहिली पोळी, गरजू मुखात पोचली पाहिजे, हा आईचा परिपाठ होता.कालपरत्वे पाडवा आणि आमरसाच्या हंगामात, पाहुणा घरी बोलवायचा किंवा त्यांच्या घरी डबा पोचवायचा, या प्रथेमागे सुद्धा, नैवेद्याचीच श्रद्धा होती.या भावनेला भरभरून प्रतिसाद दिला तो सु ह जोशी यांनी ! आपूलकीचा तो परिपाठ पंचवीस वर्षाहून अधिक काळ, लाॅक डाऊन मधेही, चालूच आहे !
फुलांची परडी, सुखसंवाद आणि रसास्वाद, असा हा त्रिगुणात्मक पाहूणचार,सर्वांना भावतो !


शरद तळवलकर,वसंत शिंदे, आनंद यादव, गंगाधर महांबरे, वसंत बापट, मंगेश तेंडुलकर, अरूण दाते,चंद्रकांत गोखले, सईदुद्दीन डागर, यांचे बरोबरीने,द मा मिरासदार,शि द फडणीस, रवी परांजपे, मुरली लाहोटी ,आरती दातार, अरुणा ढेरे, माधवी वैद्य, अमृता सुभाष, मिलिंद जोशी, अरूण खोरे, विजय बावीसकर अशा अनेकांनी या नैवेद्याचा स्वाद घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या पंगतीत, मांडी घालून, केळीच्या पानावरच्या भोजनाचा स्वाद घेणारे राजदत्त पहाणे, हे आमच्या घराचे परमभाग्य मानतो.
नामवंत खेळाडू, चित्रकार, शिल्पकार यांच्या सुद्धा आठवणी आहेत. जीवन सुंदर करणा-या अशा मंडळींच्या सहवासातील कृतज्ञतेचे क्षण, ही अक्षय संपत्ती वाटते.
दरवर्षी ,मधूर केशरी आम्रफल पाहिले की या आठवणी जाग्या होतात आणि पुन्हा कोणाला बोलवायचे, याचा आमचे घर शोध घेत रहाते !
आमचे छोटे घर, आम आदमी सारखेच आहे पण रसाची गोडी मात्र अशा आदरातिथ्यानेच समृद्ध होत आहे.


– आनंद सराफ (लेखक गणेशोत्सव अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading