शुल्कवाढीबाबत पुणे विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय!
पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रमांच्या शुल्कवाढीच्या निर्णयास एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा विचार करून विद्यापीठाने शुल्कवाढीला स्थगिती देत विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे.
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी विद्या परिषदेची बैठक झाली. त्यात विद्यापीठ प्रशासनातर्फे सादर करण्यात आलेल्या शुल्कवाढी संदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. विद्यापीठाच्या शुल्क नियमन समितीने गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्व अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुमारे 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने शुल्क वाढीचे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्याची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार होती.

दरम्यान, कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क आकारणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क वाढीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.तसेच यापूर्वी आकारले जात असलेले जुनेच शुल्क आकारण्यास येणार असल्याचे विद्या परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, करोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत विद्या परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढीच्या शिफारशीवर चर्चा झाली. त्यानुसार शुल्कवाढसंदर्भात सकारात्मक निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.