fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

महाविकास आघाडीचं सरकार पोकळ घोषणा करत नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

करोनाची पुढची लढाई अधिक बिकट होणार, गुणाकार वाढणार! – मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा

  • सर्वधर्मीयांनी आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा

मुंबई, दि. 24- काहीजण विचारत आहेत पॅकेज का घोषित केलं नाही. आज गोरगरीबांना अन्न मिळणं, उपचार मिळणं हे महत्वाचं आहे. आपण गरीबांना उपचारासाठी मदत केली. शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपयात भोजन दिलं. 7 ते 8 लाख मजूरांना घरी पाठवलं, यासाठी कुठलं पॅकेज द्यायचं? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यभरात गोरगरीब, मजूरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? असा टोला देखील त्यांनी लगावला. आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी सुरुवातीला त्यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे. जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूपच कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. एसटीच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेजवळ सोडलं आहे. त्यासाठी 75 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. यासाठी कुठलं पॅकेज घोषित करायचं? असा सवाल देखील त्यांनी केला. हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे कोणी राजकारण करु नका. तुम्ही केलं तरी आम्ही राजकारण करणार नाही. केंद्राकडूनही अनेक गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या नाहीत मग मी बोंब मारु का ? असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

आता कोरोनासोबत जगायचं

आपण हळूहळू आपल्या आयुष्याची गाडी पूर्वपदावर आणत आहोत. मात्र हे करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. लॉकडाऊन अचानक लावणं जसं चुकीचं आहे तसंच लॉकडाऊन अचानक काढणं देखील चूक आहे. आपल्याला आता कोरोनासोबत जगायचं आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, असंही ते म्हणाले.

आकड्यांबाबत आपण अंदाज खोटा ठरवला

राज्यात मे महिन्याच्या अखेरीस सव्वा ते दीड लाख कोरोनाबाधित आढळतील असा अंदाज केंद्राच्या पथकाने नोंदवला होता. मात्र आज राज्यात केवळ 33686 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात आजघडीला  47190 कोरोनाबाधित आहेत त्यापैकी 13404 बरे झाले आहेत. आपण शिस्त दाखवली त्यामुळं आपण अंदाज खोटा ठरवला आहे. आपण शिस्त पाळल्यानेच आपण आकडे आटोक्यात आणले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात साडेतीन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गुणाकार जीवघेणा होणार

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता गुणाकार जीवघेणा होणार आहे, केसेस वाढणार आहेत. त्यामुळं आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आपण कोरोनाविरोधात लढाईसाठी सज्ज आहोत. यापुढची कोरोनाविरोधातील राज्याची लढाई अधिक बिकट होणार आहे. कोरोना रुग्णवाढीचा गुणाकार वाढणार असून तो जीवघेणा होणार आहे. आत्तापर्यंत जशी रुग्णसंख्या वाढली तशीच ती पुढील काळातही वाढणार आहे. पण यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नाही. कारण, यावर मात करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत. मे अखेरीस 14 हजार बेड उपलब्ध होतील, असं देखील त्यांनी सांगितलं.

कोरोनासोबत जगायचं आहे हे आपल्याला शिकावं लागणार आहे, असं देखील ते म्हणाले.  काहींना अजूनही याचं गांभीर्य कळत नाही. याचा अर्थ काय? ते तुम्हाला समजलं असेल. मास्क सक्तीचा का? हात का धुवायचा? या संदर्भातले बॅनर्स लावले आहेतच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

रक्तदान करण्याचं आवाहन

यावेळी त्यांनी रक्तदान करण्याचं आवाहन देखील केलं. दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळ रक्तदान करा. आपण साठा पुरेसा असल्यानं थांबवलं होतं. आता पुन्हा गरज निर्माण झाली आहे. रक्तदान करणाऱ्यांनी पुढं यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. आता पावसाळा येईल त्यामुळं इतर साथीच्या रोगांपासून देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, असं ठाकरे म्हणाले. अंगावर दुखणं काढू नका, लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. शेवटच्या टप्प्यात आल्यावर किंवा लक्षणं वाढल्यावर अनेकजण येतात. त्यामुळं अनेक मृत्यू झाले आहेत. वेळेवर उपचार मिळाल्याने आणि प्राथमिक आल्यावर जास्तीत जास्त लोकं बरी होत आहेत, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading