खासदार संजय राऊत यांनी घेतली राज्यपालांची भेट
राज्यपाल आमचे मार्गदर्शक, मुख्यमंत्र्यांसोबत अतिशय मधुर संबंध

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यपालांवर टीका करणारे संजय राऊत भेटीला पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. या भेटीमागील नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी संजय राऊत यांनी ही एक सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे. राज्यपाल आमचे मार्गदर्शक असून ही एक सदिच्छा भेट होती. राज्यपाल यांच्याशी जुने संबंध आहेत असं संजय राऊत यांनी भेट झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. राज्यपाल अचानक प्रिय कसे झाले असं विचारलं असता, राज्यपाल प्रियच असतात, ते राज्याचे पालक असतात असं त्यांनी म्हटलं.
“राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. गेल्या काही खूप दिवसांपासून आमची भेट राहिली होती. ही एक सदिच्छा भेट आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंधही अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संबंध जसे पिता-पुत्राचे असतात तसेच आहेत ते तसेच राहतील. आमच्यात कोणतीही दरी नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली असून परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसताना केलेल्या हस्तक्षेपाबाबत उच्चशिक्षणमंत्र्यांना समज द्यावी, असेही कोश्यारी म्हटले आहे. याबद्दल संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता, “उदय समामंत यांचं निवेदन वाचलं. त्यांनी मत व्यक्त केलं आहे, निर्णय घेतलेला नाही. राज्यपाला कुलपती असल्याने त्यांनी आपली भूमिका मांडली. राज्यपला सांगतील त्याप्रमाणे संबंधित मंत्री निर्णय घेतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
भाजपाच्या आंदोलनावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “सरकार खूप काही करत आहे. विरोधी पक्ष एका बेटावर आहे. त्यांना काही दिसत नसेल. राज्यपलांना सरकार किती काम करत आहे याची पूर्ण माहिती असते. सरकार त्यांना माहिती देत असतं. आंदोलन करणं अधिकार आहे. पण असं राजकीय आंदोलन करणं योग्य नाही, सरकारसोबत उभं राहिलं पाहिजे. जे मुद्दे आहेत ते थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडत चर्चा केली पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.