fbpx
Monday, September 25, 2023
PUNE

डॉक्टरांनी दवाखाने सुरु करण्याकरीता गणेश मंडळाचा हातभार

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे १५ दवाखाने व पोलीस स्टेशनला सॅनिटायझर स्टँडची मदत 


पुणे : लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी काही दुकाने व व्यवहार सुरु झाले असले, तरी देखील अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु केलेले नाहीत. छोटया-मोठया आजारांसाठी व दैनंदिन तपासणीसाठी रुग्णांना मोठया रुग्णालयात जावे लागत आहे, त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु करावे, याकरीता पुण्यातील गणेश मंडळाने पुढाकार घेतला आहे. दवाखान्यात आल्यावर कोणाचाही स्पर्श न होता, स्टँडवरील सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सोय १५ दवाखाने व पोलीस स्टेशनमध्ये देखील मंडळाने करुन दिली आहे. 
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे ११ स्टँड खासगी डॉक्टर्स व ४ स्टँड पोलीस स्टेशनला देण्यात आले. यासोबत ५ लीटरचा सॅनिटायझरचा कॅन देखील देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, डॉ.मिलींद भोई, डॉ.विजय पोटफोडे, डॉ.कुणाल कामठे, डॉ.नितीन बोरा, डॉ.दिनेश बाऊसकर, डॉ.रवींद्र काटकर, डॉ.राजेश दोशी, डॉ.विनोद सातव, आनंद सराफ, शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.नितीन झंझाड आदी उपस्थित होते. खडक, फरासखाना, फडगेट व समर्थ पोलीस स्टेशनमध्ये स्टँड देण्यात आले आहेत. 
डॉ. राजेश दोशी म्हणाले, गणेशोत्सव मंडळाने अशी मदत देणे हे कौतुकास्पद आहे. डॉक्टरांनी दवाखाने उघडण्याकरीता दिलेली ही मदत उपयुक्त आहे. सॅनिटायझरच्या बाटलीला हात न लावता पॅडलद्वारे सॅनिटायझर घेणे यामुळे शक्य आहे. त्यामुळे ही साथ पसरण्यास प्रतिबंध देखील घालता येणार आहे. 
अ‍ॅड.नितीन झंझाड म्हणाले, आजमितीस सोशल डिस्टन्सिंग व हात सॅनिटाईज ठेवणे आवश्यक आहे. त्यासोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणा-या डॉक्टरांना दवाखाने उघडण्यास उद्युक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याकरीता सॅनिटायझेशन स्टँड व ५ लीटर सॅनिटायझर कॅन दवाखान्यांना देत आहोत. त्यामुळे डॉक्टर्स आपले खाजगी दवाखाने उघडून रुग्णांची काळजी घेण्यास पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

Leave a Reply

%d bloggers like this: