योगोदा सत्संग सोसायटीच्या वतीने गरजूंना अन्नधान्याचे कीट वाटप
पुणे : मानव सेवा आणि अध्यात्माच्या माध्यमातून देशभर कार्यरत असलेल्या योगोदा सत्संग सोसायटी आॅफ इंडिया या अध्यात्मिक संस्थेच्या पुणे केंद्राच्या वतीने अन्नधान्यांच्या कीटचे वाटप करण्यात आले. जीवन हे प्रामुख्याने सेवेसाठी आहे, ही सद्गुरुंची शिकवण आचरणात आणण्याच्या भावनेने ही मदत करण्यात आली. तब्बल ५१६ कीट गरजूंना देण्यात आले. धानोरीतील स्थलांतरीत मजूरांना ही मदत देण्यात आली.
योगोदा सत्संग सोसायटी आॅफ इंडिया या अध्यात्मिक संस्थेची स्थापना १९१७ मध्ये श्री श्री परमहंस योगानंदानी यांनी केली. श्री श्री परमहंस योगानंद हे योगी कथामृत या अध्यात्मिक ग्रंथाचे लेखक म्हणून परिचीत आहेत. त्यांनी स्थापन केलेली संस्था एक शतकाहून अधिक काळ मानवतेच्या सेवेसाठी समर्पित आहे.
पुणे केंद्राचे संचालक अशोक वाही म्हणाले, जगभरातील लोकांसमोर कोरोनाचे संकट उभे आहे. त्यामुळे गरजूंना मदत करण्याची ही वेळ आहे. पुणे केंद्राच्या साधकांच्या वतीने सढळ हाताने मदत करण्यात आली आहे. यामध्ये ५ किलो तांदूळ, १ लिटर तेल, २ किलो तूर दाळ, १ किलो मीठ, साखर, हळद, साबण अशा वस्तू कीटमधून देण्यात आल्या.
संस्थेचे साधक, स्वयंसेवक-जोश कनेक्ट, युग फाऊंडेशन, रॉबिनहूड आर्मी यांच्या मार्फत कीट देण्यात आले. यावेळी फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यापुढेही गरजूंना मदत करणे चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
