रितेश देशमुख आणि जेनेलिया धावले पडद्यामागील कामगारांच्या मदतीला
देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कामगार, मजूर आपापल्या घरी परत आहेत. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकार आपापल्या परिने मदत करत आहेत. फिल्म इंडस्ट्री कडूनही मदतीचा ओघ सुरुच आहे. कोणी अन्नधान्य वाटप करत आहे, तर कोणी आर्थिक मदत करण्यास पुढे सरसावले आहेत.
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुखनेही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घेत कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांना लॉकडाऊनच्या काळात मदत करण्याचा निर्णय घेतला. सध्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या साऱ्या कामगारांना आर्थिक मदत तसेच किराणा किटचे वाटप करत आहे.
पण इतर सामाजिक संस्थांनी तसेच बॉलिवूड कलाकारांनीही मदत करावी यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले तसेच चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, संचालक यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला जेनेलिया-रितेशने साथ दिली आहे. या दोघांनी त्यांच्या मुंबई फिल्म कंपनीतर्फे दहा लाख रुपयांची मदत केली आहे. त्यांच्या या मदतीमधून चित्रपटसृष्टीतील कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांना दिलासा मिळणार आहे. रितेश-जेनेलियाने केलेली मदत खरंच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
