पुणे, दि. ३१ – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी उत्सवात इतिहासात पहिल्यांदाच श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. अनंत चतुर्दशीला मंगळवार, दिनांक १ सप्टेंबर रोजी सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी ६ वाजून ४७ मिनीटांनी मंदिरामध्येच विसर्जन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टसह अनेक मंडळांनी मंदिरामध्येच व आॅनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय यावर्षी घेतला. त्यामुळे आता दगडूशेठच्या श्रीं चे विसर्जन देखील मुख्य मंदिरातच होणार आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते सायंकाळी अभिषेक होणार आहे. त्यानंतर मंगल आरती होईल. फुलांनी सजविलेल्या पितळ्याच्या कुंडामध्ये श्रीं च्या मूर्तीचे विसर्जन होईल. ट्रस्टच्या मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत हे विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्न या… अशी प्रार्थना व आवाहन श्रीं ची चरणी यावेळी करण्यात येणार आहे.
अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या या निर्णयाचे अनुकरण केवळ पुण्यातीलच नाही, तर महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी करावे. गणेश मंडळांनी आपापल्या मंदिराच्या किंवा उत्सव मंडपाच्या परिसरात विसर्जनाची सोय करावी. तसेच समस्त पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत होणार आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागेल.
* आॅनलाईन पद्धतीने पाहता येणार ‘दगडूशेठ गणपती’ चा विसर्जन सोहळा
घरच्या घरीच श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था तसेच श्रीं चा विसर्जन सोहळा पाहण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर हा सोहळा पाहता येणार आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Related