राज्यस्तरीय आंतरशालेय पोवाडा गायन स्पर्धेत सक्षम,शौर्य प्रथम
पुणे : कै. शाहीररत्न किसनराव हिंगे जयंतीनिमित्त राष्ट्रीय शाहिरीदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय आंतरशालेय आॅनलाईन पोवाडे गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी पुणे यांच्यावतीने आयोजन करण्यात आलेल्या स्पर्धेत मोठ्या गटात सक्षम जाधव व छोट्या गटात शौर्य निंबाळकर याने प्रथम क्रमांक पटकाविला.
यावेळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते झाले. प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहिर हेमंत मावळे, प्रा.संगिता मावळे, स्पर्धाप्रमुख अरुण बाभुळगावकर, होनराज मावळे उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण संजय पुरंदरे यांनी केले, स्पर्धेचे नियोजन मुकुंद कोंडे, श्रद्धा जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाहीर अण्णाभाऊ साठे यांना पोवाड्यातून मानवंदना देण्यात आली.
मेघराज राजेभोसले म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात गुरु शिवाय विद्यार्थी घडू शकत नाहीत. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना शिस्त महत्त्वाची आहे. शिष्याला पुढे नेण्यासाठी स्वत:ला वाहून घेणारे शिक्षक आजच्या काळात कमी पहायला मिळतात. शाहिरी संपत आहे, असे दिसताना मावळे कुटुंबिय तो टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शाहिरी वर्गातून अनेक विद्यार्थी ते घडवित आहे. यामुळे शाहिरी कला टिकून राहिल, असेही त्यांनी सांगितले.
शाहीर हेमंत मावळे म्हणाले, कलाकारांना अनेक अडचणी आहेत, ज्या दूर व्हायला पाहिजेत. लोककला टिकल्या नाहीत, तर त्या कला अस्ताला जातील. चित्रपटांमध्ये देखील लोकसंस्कृती दिसायला हवी. सर्व क्षेत्रातील लोकांनी मिळून लोककला टिकविण्यासाठी प्रयत्न केले तर लोककलेचे संवर्धन होईल, असेही त्यांनी सांगितले.
निकाल: मोठा गट –सक्षम जाधव (प्रथम), हर्ष येळापूरे (द्वितीय ), निर्झरा उगले (तृतीय), छोटा गट – शौर्य निंबाळकर (प्रथम), शर्वरी उत्तेकर (द्वितीय ), सानवी मोरे (तृतीय) दोन्ही गटातील प्रथम क्रमांकास प्रत्येकी ३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह व तृतीय क्रमांकास १ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
