Monday, June 22, 2026
MAHARASHTRA

….म्हणून रखडल्या ‘त्या’ नियुक्त्या: ‘सामना’ मधून पुन्हा भाजपवर निशाणा

मुंबई, दि. ५ – येत्या. ऑक्टोबर महिन्यात वाट्टेल ती किंमत मोजून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या पैजा लागल्या आहेत. सरकार पाडल्यानंतर आपल्या मर्जीतील सदस्यांची नियुक्ती भाजपला करायची आहे, त्यामुळेच राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरामधून केला आहे.

सध्या करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नामनियुक्त आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी सरकारला दिले आहेत. हे खरे असेल तर १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. ऑक्टोबरचाच महिना कशासाठी? यावर बाहेर अशा पैजा लागल्या आहेत की, महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू. नंतर येणारे सरकार नामनियुक्त १२ जणांच्या नेमणुका करेल, पण हे केवळ स्वप्नरंजन आहे. सरकारला कोणताही धोका नाही. या राजकारणात राज्यपाल नावाची घटनात्मक संस्था नाहक बदनाम केली जात आहे. राज्यपालांच्या नावे परस्पर कोणी हे राजकारण करत असेल तर राज्यपालांनीच ते रोखायला हवे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती हा सध्या राज्यातील गरमागरमीचा विषय झाला आहे. विविध क्षेत्रांतले तज्ज्ञ राज्यपाल नेमतात, पण त्यांच्या शिफारसी मंत्रिमंडळ करते. त्यांची नेमणूक वेळेत झाली नाही तर ती घटनेची पायमल्ली व स्वातंत्र्याची मुस्कटदाबी ठरेल. आणीबाणीत नेमके हेच झाले होते, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading