Thursday, November 26, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड; १० वर्षांच्या कारावासाचीही शिफारस, एमपीएससी परीक्षांमध्ये मोठे बदल होणार!

मुंबई : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरभरती प्रक्रियेत होणारे पेपरफुटीचे प्रकार, गैरव्यवहार आणि संघटित भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. पेपरफुटीच्या माध्यमातून सुरू असलेल्या गैरकारभाराला आळा घालण्यासाठी दोषींना १० कोटी रुपयांचा किमान दंड आणि १० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा देण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या दुसऱ्या अहवालात परीक्षा प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्याबरोबरच कठोर कायदेशीर तरतुदी सुचवल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांत एमपीएससीसह विविध भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांच्या विश्वासाला तडा गेला आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी आपला दुसरा अहवाल शासनाला सादर केला.
या अहवालानुसार, पेपरफुटीच्या संघटित गुन्हेगारीत सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना सात ते दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्याची शिफारस आहे. याशिवाय किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे. परीक्षांमध्ये गैरमार्गांचा वापर करणाऱ्यांना पाच ते दहा वर्षांपर्यंत कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्थांना पाच कोटी रुपयांपर्यंत दंड आणि आठ वर्षांसाठी बंदी घालण्याची शिफारसही करण्यात आली आहे.
परीक्षांमधील गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्याची सूचना समितीने केली आहे. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष कृती दल अर्थात एसटीएफ स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच अशा प्रकरणांमधील खटले लवकर निकाली काढण्यासाठी स्वतंत्र विशेष न्यायालये स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
या कठोर उपाययोजनांबरोबरच एमपीएससीच्या परीक्षार्थींना दिलासा देणाऱ्या तरतुदीही अहवालात सुचवण्यात आल्या आहेत. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. उत्तरतालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास त्यासाठी भरलेले शुल्कही परत मिळणार आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना करण्यात आली आहे. उमेदवारांना आधार किंवा MahaID च्या माध्यमातून एकदाच नोंदणी करता येईल, अशी सुविधाही प्रस्तावित आहे.
परीक्षांच्या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. सरकारी विभागांमधील रिक्त पदांची माहिती वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी इंटिग्रेटेड रिक्विझिशन पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. संबंधित विभागांनी दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे, असेही सुचवण्यात आले आहे.
प्रशासनाच्या पातळीवरही महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्यात येणार आहे. परीक्षांसाठी स्वतंत्र परीक्षा केंद्रांची बँक अर्थात व्हेन्यू बँक तयार करण्याची सूचना आहे. परीक्षा केंद्रांची निवड आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षांमधील तांत्रिक गैरप्रकार आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञान व सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे.
राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या दुसऱ्या अहवालातील शिफारशी सरकारने स्वीकारून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल घडू शकतात. विशेषतः पेपरफुटीच्या विळख्यात अडकलेल्या भरती प्रक्रियेला शिस्त लावण्यास आणि गुणवत्तेच्या जोरावर यश मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यास या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

Leave a Reply