Sunday, September 20, 2026
Latest NewsSports

‘हिंदवी वॉरीयर्स करंडक‌’ वरिष्ठ महिलांच्या आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे २१ सप्टेंबरपासून आयोजन !!

 

पुणे :  वॉरीयर्स स्पोर्ट्‌स तर्फे ‘हिंदवी वॉरीयर्स करंडक‌’ वरिष्ठ गट महिलांच्या आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीमध्ये फुरसुंगी येथील वॉरीयर्स क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पुणे आणि परिसरातील असे महिलांचे एकूण १० संघ सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक स्वप्निल मोडक यांनी सांगितले की, गेल्या दशकापासून क्रिकेटमध्ये मुलींचा सहभाग वाढत असून पुण्यामध्येसुद्धा मुलींचे क्रिकेट क्षेत्र विस्तारत आहे. क्रिकेटचे प्रशिक्षण घेणाऱ्या पुण्यातील वेगवेगळ्या क्लब, ॲकॅडमी यातील महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना व्यावसायिक आणि स्पर्धात्मक खेळाचा सराव व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. एक-दिवसीय प्रकारात सामने खेळविण्यात येणार असल्याने एक वेगळा अनुभव महिलांना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्पर्धेला ‘हिंदवी व्हेज हॉटेल‌’ यांनी विशेष सहकार्य केले असून स्पर्धेदरम्यान खेळाडूंना सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण ‘हिंदवी व्हेज हॉटेल‌’ तर्फे देण्यात येणार असल्याचे मोडक यांनी सांगितले.
पांढऱ्या चेंडूवर होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २४ सामने होणार आहेत असे स्वप्निल मोडक यांनी सांगितले. स्पर्धेचे सामने हे ५०-५० षटकांचे होणार असल्याने महिलांना महाराष्ट्र क्रिकेट संघटनाच्या (एसीए) निमंत्रित सामन्यांचा सराव होईल, असा आमचा उद्देश आहे.
स्पर्धेत वॉरीयर्स ॲकॅडमी, रिक्रीएशन ॲकॅडमी, चांगभल क्रिकेट क्लब, अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमी, एलिट क्रिकेट ॲकॅडमी, मॅव्हरीक्स्‌ क्रिकेट ॲकॅडमी, ओम साई ॲकॅडमी, गॅरी कर्स्टन ॲकॅडमी, डिलीजंट ॲकॅडमी आणि जोश-प्रो क्रिकेट ॲकॅडमी या दहा संघांमध्ये विजेतेपदाची चुरस असणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक आणि उपविजेत्या संघाला करंडक आणि मेडल्स्‌ अशी पारितोषिक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना पारितोषिक मिळणार आहे. प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि ‘फायटर ऑफ द मॅच‌’ अशी पारितोषिकांची रेलचेल स्पर्धेत असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading