Monday, August 31, 2026
Latest NewsSports

सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत देव रुपारेलिया, इशिता नेगी यांना विजेतेपद 

पुरुष दुहेरीत पवन सुरेश व पुनीत सुरेश यांना विजेतेपद
पुणे : पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स 19 वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबईच्या देव रुपारेलिया याने तर, मुलींच्या गटात दिल्लीच्या इशिता नेगी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम सामन्यात अव्वल मानांकित देव रुपारेलिया याने सोळाव्या मानांकित उत्तराखंडच्या
निश्चल चंदचा 21-16, 21-16 असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हा सामना 46 मिनिटे चालला. सामन्यात देव याने जोरदार खेळ करत पहिला गेम 21-16 असा जिंकून आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा गेम मध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. 18-16 अशा फरकाने देव आघाडीवर असताना निश्चल याने सर्विस फॉल्ट केला व त्याचा फायदा घेत देवने आपले वर्चस्व कायम राखत हा गेम 21-16 अशा सारख्याच फरकाने जिंकून विजय मिळवला. देव हा कंचन स्कूल मध्ये 12वी इयत्तेत शिकत असून मुंबई नितीश बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम सामन्यात 17 वर्षीय दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या इशिता नेगी हिने महाराष्ट्राच्या गाथा सूर्यवंशीचा 21-19, 21-18 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. हा सामना 36 मिनिटे चालला. इशिता ही प्रायव्हेट स्कूलमध्ये बारावी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून नोएडा येथील सनराईज बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक साहिल खान व रेेहमान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
पुरुष दुहेरीत अंतिम लढतीत भारताच्या पवन सुरेश याने पुनीत सुरेश च्या साथीत इंडोनेशियाच्या आर्यबका ओक्टा डिसाबियन व मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया यांचा 25-23, 21-19 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. हा सामना 32 मिनिटे चालला.
मिश्र दुहेरीत अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या
मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया व अफिजाह रहमाधानी यांनी भारताच्या पुनित सुरेश व दीपक राज आदिती यांचा 24-26, 21-17, 21-16 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलींच्या दुहेरीत अंतिम लढतीत थायलंडच्या चन्थरात मर्ंदाकुल व पर्प्लॉय सुत्तीवारायनॉन या जोडीने चौथ्या मानांकित भारताच्या दिया भीमैया व कीर्थी मंचला यांचा 21-15, 21-11 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 34 मिनिटे चालला.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना पुणे महापौर करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुंदर शेट्टी, गिरीश नातु, मंजुषा सहस्रबुद्धे, योनेक्स सनराइजचे बालकिशन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, पीडीएमबीएचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, सरचिटणीस सीए रणजीत नातू, सह सचिव आनंद जोशी, खजिनदार सारंग लागू, स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, मिहीर रातांजनकर, उपाध्यक्ष अविनाश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: 19 वर्षांखालील मुले: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी:
देव रुपारेलिया(भारत) (1)वि.वि. निश्चल चंद(भारत)(16)21-16, 21-16;
मुली:इशिता नेगी(भारत)(2)वि.वि.गाथा सूर्यवंशी(भारत)21-19, 21-18;
पुरुष दुहेरी: पवन सुरेश/पुनीत सुरेश(भारत)वि.वि.
आर्यबका ओक्टा डिसाबियन/मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया (इंडोनेशिया)25-23, 21-19;
मुली दुहेरी:चन्थरात मर्ंदाकुल/पर्प्लॉय सुत्तीवारायनॉन(थायलंड) वि.वि.दिया भीमैया/कीर्थी मंचला (भारत)(4)21-15, 21-11;
मिश्र दुहेरी: मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया/अफिजाह रहमाधानी(इंडोनेशिया) वि.वि.पुनित सुरेश/दीपक राज आदिती(भारत) 24-26, 21-17, 21-16.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading