किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे १९ वे पर्व; यंदा इन-पर्सन होणार आयोजन
पुणे : किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची (KVIFF) प्रेक्षक अनेक दिवसांपासून उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर या महोत्सवाचे १९ वे पर्व यंदा पूर्णपणे ऑफलाईन (इनपर्सन) पद्धतीने आयोजित केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘एसएल किर्लोस्कर सीएसआर फाउंडेशन’तर्फे २२ ऑगस्ट २०२६ रोजी या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा महोत्सव ‘ब्रॉट टू यू बाय अर्थ’ (Brought to you by Earth) या संकल्पनेवर आधारित आहे. नागरिकांना निसर्गाच्या अधिक जवळ आणणे, तसेच बदलणारे हवामान आणि संवेदनशील पर्यावरण याद्वारे पृथ्वी देत असलेल्या संकेतांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
चित्रपटांचे स्क्रिनिंग, खुली चर्चा आणि लोकसहभागाच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी २००७ मध्ये ‘किर्लोस्कर वसुंधरा’ची सुरुवात झाली होती. गेल्या काही वर्षांत या उपक्रमाचे रूपांतर देशातील एका आघाडीच्या पर्यावरण चळवळीत झाले आहे. हे व्यासपीठ जगभरातील पर्यावरणवादी, निसर्ग संवर्धन क्षेत्रात काम करणारे तज्ञ आणि सामान्य नागरिकांना एकत्र आणून शाश्वत भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची प्रेरणा देते. विशेष म्हणजे की, कोविड-१९ च्या महामारीनंतर हा चित्रपट महोत्सव ऑनलाईन स्वरूपात आयोजित केला जात होता, जो आता पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
‘एसएल किर्लोस्कर सीएसआर फाउंडेशन’च्या संचालिका आरती किर्लोस्कर म्हणाल्या की, “गेल्या १८ वर्षांत किर्लोस्कर वसुंधरा हे व्यासपीठ अर्थपूर्ण चर्चा आणि प्रभावी कथांच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करणारे आणि लोकांना प्रेरित करणारे एक सशक्त माध्यम बनले आहे. हा फेस्टिव्हल पुन्हा एकदा इनपर्सन मोडमध्ये परतत असल्याचा आम्हाला मनापासून आनंद होत आहे. यामुळे प्रेक्षकांना एकत्र येऊन या महोत्सवाच्या मूळ उद्देशाचा सामूहिक अनुभव घेता येईल. यंदाची ‘ब्रॉट टू यू बाय अर्थ’ ही थीम लोकांना आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचे निरीक्षण करण्यास, त्याचे कौतुक करण्यास आणि त्याचे जतन करण्यास प्रवृत्त करते. आम्ही पुण्याचे सर्व विद्यार्थी, कुटुंबे, निसर्गप्रेमी आणि नागरिकांचे या महोत्सवात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत.”
दोन दिवस चालणारा हा चित्रपट महोत्सव २१ आणि २२ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित केला जाईल. महोत्सवाचा पहिला दिवस खास करून किर्लोस्कर ग्रुपच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असेल, तर दुसऱ्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना यामध्ये सहभागी होता येईल.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची (२२ ऑगस्ट) सुरुवात सकाळी ९ वाजता होईल. यामध्ये सी. बी. तुपे साधना कन्या विद्यालय, लोयोला हायस्कूल आणि सेंट जोसेफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये दोन लघुपटांचे स्क्रिनिंग, खुली चर्चा आणि थीमवर आधारित एका कार्यशाळेचा समावेश असेल. तरुण पिढीमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव आणि जागृती निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
दुपारी ३:०० ते संध्याकाळी ७:३० या वेळेत होणारे संध्याकाळचे सत्र सर्वांसाठी खुले असेल. यामध्ये पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणारे नागरिक सहभागी होऊ शकतात. या सत्राची सुरुवात मेळघाटमधील आदिवासी समुदायाद्वारे सादर केल्या जाणाऱ्या ‘घुंगरू’ या आकर्षक लोकनृत्याने होईल. यानंतर, ‘ऑल्ट ईएफएफ’ (ALT EFF) द्वारे निवडलेले पर्यावरणावर आधारित तीन लघुपट (शॉर्ट फिल्म्स) आणि एक फीचर फिल्म दाखवली जाईल; तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले एक छोटे नाटकही (स्किट) सादर केले जाईल. कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी ‘वसुंधरा सन्मान’ आणि ‘वसुंधरा मित्र’ पुरस्कार प्रदान केले जातील. पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. महोत्सवातील प्रवेश ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर पूर्णपणे विनामूल्य असेल.
‘एसएल किर्लोस्कर सीएसआर फाउंडेशन’चे सीईओ जगदीश पुरंदरे म्हणाले की, “यंदा आमचे सहयोगी ‘इकोलॉजिकल सोसायटी’ आणि ‘द यूथ कॉस्मो’ यांचे सहकार्य किर्लोस्कर वसुंधराचा विस्तार आणि प्रभाव वाढवण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, चित्रपट आणि चर्चासत्रांव्यतिरिक्त या वेळी प्रेक्षकांना ‘इको बाजार’चाही आनंद घेता येईल. या बाजारपेठेत विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था इकोफ्रेंडली उत्पादने, पर्यावरणाला पूरक पर्याय आणि सेंद्रिय खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणार आहेत. पुरस्कार आणि महोत्सवातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक स्तरावर पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा सन्मान करणे हा आमचा उद्देश आहे.”
पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये दुपारी ३:०० ते संध्याकाळी ७:३० या वेळेत ‘इको बाजार’चे आयोजन करण्यात येईल. या बाजारपेठेत ‘द तिम्बकटू कलेक्टिव्ह’, संपूर्ण बांबू केंद्र, ‘हुनर गुरुकुल’, ‘आदि ग्रीन’ ‘द यूथ कॉस्मो’ आणि ‘विचक्रॉफ्ट’ यांसारख्या प्रमुख संस्थांनी तयार केलेली पर्यावरणपूरक उत्पादने, सस्टेनेबल इनोव्हेशन्स आणि सामाजिक उपक्रमांची झलक पाहायला मिळेल.
धरती मातेला संस्कृतमध्ये ‘वसुंधरा’ म्हटले जाते, या संस्कृत शब्दावरून प्रेरणा घेऊन, पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करणे आणि लोकांना प्रेरित करणे या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. एका छोट्याशा पर्यावरण प्रदर्शनापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका जागतिक व्यासपीठाच्या रूपात समोर आला आहे. हे व्यासपीठ चित्रपट, तज्ञांशी संवाद, आउटरीच कार्यक्रम आणि लोकसहभागाच्या माध्यमातून पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि शाश्वत जीवनशैलीला चालना देत आहे. गेल्या काही वर्षांत हजारो घटकांना स्वतःशी जोडून घेत ‘किर्लोस्कर वसुंधरा’ पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणण्याचे माध्यम बनून उदयास आले आहे.
