Friday, July 3, 2026
Latest NewsPUNE

हवालदाराची भाईगिरी! एपीआयला ठाण्यातच मारहाण; मुजोर वर्तनामुळे निलंबन


पुणे : पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारी धक्कादायक घटना पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात उघडकीस आली आहे. एका पोलिस हवालदाराने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत वाद घालत सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) यांना पोलिस ठाण्याच्या आवारातच शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रजनीकांत चिलुमूल यांनी संबंधित हवालदार विवेक रमेश बसनगार यांना तात्काळ निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक बसनगार हे चतुःशृंगी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांनी कर्तव्यावर असताना वरिष्ठ अधिकारी तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांशी अरेरावीची व अश्लील भाषा वापरल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी १० मार्च रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसुरी अहवाल सादर केला होता. त्यानंतर बसनगार यांच्यावर पाच हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला होता.
या कारवाईचा राग मनात धरून बसनगार यांनी २६ जून रोजी खडकी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलत त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर २७ जून रोजी ते तपास पथकातील एपीआयच्या केबिनमध्ये जाऊन मोबाईलवर चित्रीकरण करत, “तुम्ही माझी स्टेशन डायरी का केली? त्यामुळे मला शिक्षा झाली,” असा जाब विचारत धमकावल्याचे सांगितले जाते.
तेथे उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी एपीआयला अश्लील शिवीगाळ करत अंगावर धाव घेतल्याची नोंद स्टेशन डायरीत करण्यात आली. त्यानंतर २९ जून रोजी सकाळी संबंधित एपीआय पोलिस ठाण्यात आल्यानंतर बसनगार यांनी दुचाकी भरधाव चालवत त्यांना अडवले आणि शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त रजनीकांत चिलुमूल यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. प्राथमिक चौकशीनंतर त्यांनी विवेक बसनगार यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या प्रकरणात बसनगार यांच्या तीन ते चार कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. या क्लिपमध्ये ते स्वतःला “डायरेक्ट विवेकभाई बात कर रहा है” असे म्हणत शिवीगाळ, काठ्या-कुऱ्हाडी काढण्याच्या धमक्या देताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच संबंधित एपीआयच्या सोलापूर येथील नातेवाइकांची माहिती काढण्याचे निर्देशही एका व्यक्तीला देत असल्याचे कथित ऑडिओमध्ये समोर आले आहे.
यापूर्वीही बसनगार यांनी याच पोलिस ठाण्यातील एका एपीआय तसेच चौकशी करणाऱ्या पोलिस निरीक्षकांशी अर्वाच्य भाषेत वर्तन केल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिस दलातील शिस्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading