Tuesday, May 26, 2026
Latest NewsPUNE

मनाची शांती समजून घेण्यासाठी नैसर्गिक नाते निर्माण करण्याची गरज – आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद

पुणे –  मनाची शांती समजून घेण्यासाठी त्याच्याबरोबर नैसर्गिक नाते निर्माण करण्याची  गरज असल्याचे मत आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी रविवारी व्यक्त केले. आयुष प्रकाशनातर्फे लेखक कौस्तुभ साबळे यांनी लिहिलेल्या “शांत मन – the secret of life” या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, प्रसिद्ध नाटककार डॉ. चंद्रशेखर फणसळकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य, डॉ. निरंजन ढेकणे, डॉ. धनंजय बोडस आदी मान्यवर उपस्थित होते.  सचिन पंडित यांनी पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन केले.

आपल्यामध्ये असणाऱ्या  “मी ” चे दर्शन घेण्याची आवश्यकता असून त्यामधून आपल्यामध्ये दडलेल्या अस्तित्वाची जाणीव होण्यास मदत होणार आहे. आपल्यामध्ये असणारे चैतन्य हे खरे सिक्रेट ऑफ लाईफ असते. प्रत्येकाने  त्याची अनुभूती घेण्याची आवश्यकता आहे. आपण स्वतःला सर्व बाजूने समजावून घेतले तर आपल्याला सर्वसमावेशक दृष्टी मिळणे शक्य होणार असल्याचे डॉ. विनोद यावेळी म्हणाले.

आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांची सकारात्मक कथा आपण रचली तर मनाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. मनामध्ये घडण्या घटनांचे प्रतिबिंब आपल्या मनावर परिणाम करत असतात त्यामुळे मनाचे आरोग्य चांगले ठेवण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी व्यक्त केले.

मन कसे असते याचा शोध भल्याभल्या मानस शास्त्रज्ञाना लागला असेल असे वाटत नाही. मनाला शांत ठेवणे हि अवघड प्रक्रिया आहे. भूतकाळ, भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचा मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे मनाचे आरोग्य उत्तम ठेवण्याचे काम प्रत्येकाने करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. सदानंद बोरसे यावेळी म्हणाले.

मनाचे आरोग्य हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोठा भाग आहे. अलीकडच्या काळात वाढलेले ताणतणाव, वेळेचे व्यवस्थापन यामध्ये मनाचे आरोग्य उत्तम ठेवणं आवश्यक आहे. लेखक कौस्तुभ साबळे यांनी लिहिलेल्या “शांत मन – the secret of life” या पुस्तकामधे त्याची उत्तरे मिळतात, असे डॉ. अभिजित वैद्य यावेळी म्हणाले.

कौस्तुभ साबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. निरंजन मेढेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading