सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशनच्या ईएसजी फोरमची वर्षपूर्ती
पुणे : प्रत्येक कॉर्पोरेट संस्थेला आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत अनेकविध प्रभावी कामे करण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. अनेकदा कॉर्पोरेट संस्थांकडे निधी असून देखील तो योग्य सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचत नाही किंवा योग्य कारणासाठी वापरला जातोच असेही नाही. हेच लक्षात घेत सीएसआर निधीचा प्रभावीपणे वापर करीत योग्य संस्थांना योग्य उपक्रमांसाठी जोडून देण्याच्या उद्देशाने सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात सीपच्या वतीने एन्व्हायर्नमेंटल सोशल गव्हर्नन्स म्हणजेच ईएसजी फोरमची निर्मिती वर्षभरापूर्वी करण्यात आली.
या व्यासपिठाद्वारे मागील एका वर्षांत भरीव कामगिरी करीत जणू एक चळवळ उभारण्यात आली असून आज ईएसजी फोरमद्वारे तब्बल ३५ उद्योग संस्था आणि १७ सामाजिक संस्था एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. याशिवाय शहरातील घनकचरा व्यवस्थापन आणि वाहतूक समस्यांवर लक्ष केंद्रित करीत वर्षभरात जागृत नागरिकांची चळवळ उभी करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला असल्याची माहिती ईएसजी प्रकल्पाचे प्रमुख आणि सीपचे सचिव विद्याधर पुरंदरे यांनी दिली.
या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना सीपचे अध्यक्ष शिवराज साबळे म्हणाले की, “गेली अनेक वर्षे पुणे शहरातील सॉफ्टवेअर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासोबतच संघटीत ठेवण्यासाठी सीप कार्यरत आहे. नेतृत्त्व, तंत्रज्ञान, गो टू मार्केट आणि ऑपरेशनल एक्सलन्स या चार महत्त्वाच्या विभागात सीप प्रामुख्याने काम करते. मात्र कंपन्यांना त्यांच्या सीएसआर उपक्रमासाठी एक शाश्वत व्यासपीठ उभारण्याच्या दृष्टीने संस्थेच्या वतीने मागील वर्षी ईएसजी अर्थात एन्व्हायर्नमेंटल सोशल गव्हर्नन्स या विषयावरील काम हाती घेण्यात आले. या अंतर्गत सीप हे कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांमधील महत्त्वाचा दुवा बनले आणि नागरिकांसाठी एक शाश्वत व्यासपीठ निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. याचाच एक भाग म्हणून मागील दोन वर्षे सीपने पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉगचे आयोजन देखील केले. पुण्यात शाश्वत बदलासाठी एक जिवंत परिसंस्था निर्माण करणे, हाच यामागील प्रमुख उद्देश होता.”
मागील एका वर्षांत झालेल्या कार्यक्रमांविषयी माहिती देताना विद्याधर पुरंदरे पुढे म्हणाले, “या व्यासपिठा अंतर्गत शहरातील पर्यावरणीय प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्था, झोपडपट्ट्यांशी संबंधित प्रश्न, अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रश्न, आर्थिक दुर्बल घटकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे अशा अनेक विषयांवर काम करण्याचे आम्ही ठरविले होते आणि त्या अनुशंगाने काही उपक्रम वर्षभरात आयोजिले होते. यामध्ये ‘सीएसआर फ्रॉम कम्पायन्स टू पर्पज’ हा परिसंवाद, घनकचरा व्यवस्थापन आणि वाहतूक समस्या आणि त्याविषयीची जागरूकता यांचा समावेश होता. याशिवाय पुण्यातील नदीपात्रात स्वच्छता मोहोमेचे आयोजन आम्ही केले, यामध्ये पांचजन्य फाउंडेशन आणि क्लायमेट ट्रूपर्स या संस्थांचे सहकार्य आम्हाला लाभले. पर्यावरण संवर्धनाची सुरुवात आपण ज्या जमिनीवर चालतो तिथूनच होते हेच जणू ही स्वच्छता मोहीम आम्हाला शिकवून गेली. याशिवाय पूर्णम इकोव्हिजनच्या सहकार्याने स्थानिक समुदायांच्या तात्काळ, गंभीर गरजा अचूकपणे आणि सन्मानाने पूर्ण करण्यावर देखील आम्ही लक्ष केंद्रित करू शकलो.” याशिवाय घनकचरा व्यवस्थापनावर धोरणात्मक गोलमेज परिषद, ऑनलाईन सत्रे यांचेही आयोजन करण्यात आले होते ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, असेही पुरंदरे यांनी नमूद केले.
