Sunday, April 26, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

व्यवस्थाबदलासाठी महिलांचा सहभाग आवश्यक: जयंत चौधरी

सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटीमध्ये युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन

पुणे:  व्यवस्था चालवणारे लोक बदलाला फारसे अनुकूल नसतात. व्यवस्थेत विधायक बदल घडवून आणण्यासाठी महिलांनी सक्रिय पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी व्यक्त केले.

ज्यात चौधरी यांच्या हस्ते सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटीमध्ये आशियातील पहिल्या युनेस्को समावेशन व कौशल्य विकास अध्यासनाचे आणि महिला सक्षमीकरणाबाबत आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पार पडले. या वेळी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे, नॉर्वेच्या वाणिज्यादूत मोनिका नागेलगार्ड, युनेस्को दक्षिण आशिया कार्यक्रम विशेषज्ञ जियान क्षी तेन्ग, गॅब्रिएल बोर्डाडो, सिंबायोसिस. स्किल युनिव्हर्सिटीच्या प्र कुलपती स्वाती मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.

लिंग समभवाच्या बाबतीत भारताचा इतिहास फारसा भूषणावह नाही. सध्याच्या काळात मात्र परिस्थिती बदलत असून महिला हिरीरीने पुढे येत आहेत.. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकारचा विधायक दृष्टिकोन आहे. नव उद्योगांमध्ये (स्टार्ट अप्स) एक तृतीयांश प्रमाण महिला उद्योजकांचे आहे. देशातील आघाडीच्या उद्योगांमध्ये महत्त्वाच्या निर्णायक पदांवर महिला कार्यरत असल्याचे दिसून येते. ज्या उद्योगांमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार महिलांकडे आहेत अशा उद्योगांनी मोठी प्रगती केल्याचे पहायला मिळते., असे चौधरी यांनी नमूद केले.

महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे आणि महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवणे यासाठी राज्याचा कौशल्य विकास विभाग आणि महिला बालकल्याण विभाग एकत्रितपणे काम करत असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. संरक्षण तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रातही महिला पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सिंबायोसिस स्किल युनिव्हर्सिटीसारख्या शैक्षणिक संस्थांबरोबर सहकार्य करार करून राज्य शासन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अधिक प्रभावी कार्यक्रम हाती घेईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या पुढील काळात महिला विकासाकडून महिलांच्या नेतृत्वाखाली विकास, इथपर्यंत आपल्याला जायचे आहे, याची जाणीवही तटकरे यांनी करून दिली.

महिलांना सुशिक्षित, कुशल आणि उद्यमशील बनवणे हे केवळ लिंग समभावा पुरते मर्यादित नाही तर आर्थिक स्थैर्य आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने ती आवश्यक बाब असल्याचे मोनिका नागेलगार्ड यांनी नमूद केले.

सिंबायोसिस स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून वंचित वर्गातील युवतींना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. विद्यापीठाची रोजगार क्षमता शंभर टक्के आहे. औपचारिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसह कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकास याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. विद्यापीठाला प्राप्त होणारा सीएसआर निधी दोन कोटी वरून 20 कोटी पर्यंत गेला आहे. देशभरातील तेरा उद्योग विद्यापीठांशी जोडले गेले आहेत, अशी माहिती स्वाती मुजुमदार यांनी यावेळी दिली.

विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क, या परिसंवादात जागतिक संस्था, धोरण करते, उद्योजक, शिक्षणतज्ञ यांनी सहभाग घेतला. संरक्षण तंत्रज्ञान, रोबोटिक्स, उद्योग 4.0, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमी कण्डक्टर तंत्रज्ञान आणि ग्लोबल कपॅसिटी सेंटर या क्षेत्रात रोजगाराच्या संधी बाबत या परिसंवादात विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading