महिला आरक्षण विधेयक नामंजूर होणे दुर्दैवी – उदय सामंत
पुणे: “सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यांना मदतीचा हात देण्याचा धर्म शिवसेना पक्षाने पाळलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे अखेरच्या श्वासापर्यंत सामान्यांसाठी कार्यरत होते. त्यांच्याच नावाने शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष’ ही लोकचळवळ सुरु झाली आहे. पुण्यातील नागरिकांना या कक्षाचा चांगला लाभ होईल व शिवसेनेची सामान्य लोकांप्रती असलेली बांधिलकी अधिक घट्ट होईल,” असे प्रतिपादन उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केले.
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे राज्य प्रमुख व शिवसेनेचे राज्य निवडणूक समन्वयक वैभव वाघ यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे, सुधीर कुरूमकर, आबा बागुल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिवसैनिकांचा गौरव करण्यात आला. तसेच ठाण्यातील टेम्भीनाक्यावरील देवीचे पूजन व शासकीय योजनांची दहीहंडी फोडण्यात आली.
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होणे दुर्दैवी
माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, “कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. अशा नीच प्रवृत्ती ठेचून काढण्याची शिवसेनेची भूमिका आहे. या प्रकरणाचा एसआयटी तपास सुरु असून, त्यातील सत्य लवकरच बाहेर येईल. दोषींना सोडले जाणार नाही. तपास यंत्रणेच्या कामात मला हस्तक्षेप व त्यावर भाष्य करता येणार नाही. खरातसोबत कोणाचे फोटो आले म्हणजे तेही तितकेच दोषी आहेत, असे मानने योग्य नाही. महिलांसाठी आणलेले विधेयक लोकसभेत नामंजूर होणे दुर्दैवी होते. हा दिवस खऱ्या अर्थाने काळा दिवस होता. देशातील महिलांना सन्मान व न्याय देण्यासाठी आणलेले हे विधेयक नाकारून विरोधकांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना महिलांसमोर जाऊन आता मते मागण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांना महिलांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे. उबाठा गटाच्या माजी खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला असेल, तर त्यांचे अभिनंदन करायला हवे, असे उदय सामंत म्हणाले. असेल तर त्यांचा अभिनंदन केलच पाहिजे, असे उदय सामंत यांनी नमूद केले. विधानपरिषदेच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत. १२ तारखेपूर्वी याबाबत निर्णय होईल. नवीन चेहरा द्यायचा की जुना चेहरा द्यायचा, याचे अधिकार शिंदे यांनाच आहेत. त्यामुळे योग्यवेळी निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
