Sunday, March 15, 2026
Latest NewsPUNE

पडद्यामागे काम करणाऱ्या महिला कलाकारांनी केले अनुभवकथन

हिंदू महिला सभेतर्फे पडद्यामागील ‘ती’ या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : चित्रपट किंवा टीव्हीवरील एखादी मालिका पाहताना आपण सहज व नकळतपणे त्याचा आनंद घेत असतो. मात्र, चित्रपट – मालिका घडविण्यामागे अनेकजण आपली कला पणाला लावत असतात. आपल्या बुध्दितमत्तेचा वापर करून लेखक मालिकांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जातात, निर्माते मंडळी आपल्यासमोर असणारी आव्हाने पेलत चांगला आशय असणारे विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतात, आकर्षक वेशभूषा आणि मेकअपमधून हुबेहूब व्यक्तीरेखा साकार होण्याचे काम होत असते… असे कामांचे अनेक अनुभव  कला, साहित्य, चित्रपट, मालिका यांच्या पडद्यामागे काम करणाऱ्या दिग्गज महिला कलाकारांनी कथन केले आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हिंदू महिला सभेतर्फे आयोजित पडद्यामागील ‘ती या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात लेखिका मुग्धा गोडबोले, ‘कान्हा’ज् मॅजिक या निर्मिती संस्थेच्या प्रमुख मंजिरी भावे, वेशभूषाकार पूर्णिमा ओक आणि प्रोस्थेटिक मेकअप कलाकार सानिका गाडगीळ यांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ  अभिनेत्री शुभांगी दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले यावेळी उपस्थित होत्या.

१५ वर्ष आयटी कंपनीमध्ये नोकरी करताना दर महिन्याच्या एक तारखेला बँक खात्यामध्ये पगार जमा व्हायचा. पण घरातील जबाबदारीमुळे  नोकरी सोडली. रिकामे डोके असणे चांगले नसते, त्यामुळे काहीतरी करण्याच्या उद्देशातून कान्हा’ज् मॅजिक या निर्मिती कंपनीच्या कामाला सुरुवात झाली. पती सुबोध भावेने पूर्वीच या संस्थेची नोंदणी करून ठेवली होती. या कंपनीच्या कामाची सुरवात करताना आयटी कंपनीमध्ये केलेल्या कामाचा चांगला फायदा झाल्याचे मंजिरी भावे यांनी यावेळी सांगितले.

लहानपणापासून आपल्याला असणारी वक्तृत्त्व स्पर्धेची आवड, त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना लागलेली नाटकांची आवड, ‘आभाळमाया’ मालिकेसाठी विनय आपटे यांनी केलेला फोन यामधून हौस म्हणून सुरु झालेला अभिनय क्षेत्रातील प्रवास आता लेखिका होण्यापर्यंत पोहचला असल्याचे मुग्धा गोडबोले यावेळी म्हणाल्या.

एका मालिकेसाठी अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असताना तिथे पाहिलेल्या कपडयांमुळे इथे काहीतरी वेगळे आहे, असा विचार करून  वेशभूषाकार म्हणून पुढे येण्याची संधी शोधल्याचे पूर्णिमा ओक यांनी नमूद केले. वेगळ्याच कलेच्या क्षेत्रात काम करायचे हे ध्येय आपण ठेवले होते. तेच पूर्ण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात झाल्याचे  प्रोस्थेटिक मेकअप कलाकार सानिका गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.

मालिकांवर चॅनेलचा चेहरा ठरतो, त्यामुळे मालिका तयार करताना निर्मात्याच्या बरोबरच लेखक, चॅनलची गरज या  गोष्टी महत्वाच्या असतात. कोणत्याही मालिकेचे ५० भाग पूर्ण होईपर्यंत थोडी तारांबळ होते. मात्र, मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली की त्यामुळे लोकप्रियतेत वाढ होत असल्याचे मंजिरी भावे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.  मालिकांचे लेखन करताना लेखकाच्या बरोबरीनेच मालिकांचे निर्माते, दिग्दर्शक, अशा अनेक जणांचा सहभाग त्यामध्ये महत्वाचा असतो. लेखक म्हणून काम करताना मालिकेच्या त्या विषयाची पार्श्वभूमी, त्यामधील  व्यक्तिरेखांची भाषा यांचा अभ्यास करावा लागत असल्याचे मुग्धा गोडबोले म्हणाल्या.

सिनेमात दिसणारा व्यक्तिरेखाचा मेकअप करण्याचे काम खूपच कुशलतेने करावे लागते. अलीकडच्या काळात तंत्रज्ञान बदलले आहे, त्यामुळे शरीराला खोटे बॉडी पार्ट लावणे, खोट्या जखमा करणे अशी कामे प्रोस्थेटिक मेकअपमध्ये करण्यात येत असल्याचे सानिया गाडगीळ यांनी सांगितले. यावेळी सुषमा गंगावणे यांना डोळा फुटल्याचा मेकअप करण्याचे प्रात्यक्षिक करत त्यांनी उपस्थितांची चकित केले.

ऐतिहासिक चित्रपटातील व्यक्तिरेखांची पात्रे उभी करताना त्यामध्ये बारकाईने अभ्यास करावा लागतो. सिनेमाची कथा ज्या प्रकारची आहे, त्याला अनुरूप असेच काम करावे लागते, त्यामुळे इथे कायमच मोठे आव्हान असते. लेखक, दिग्दर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी होतात, त्यामधून चांगली कलाकृती उभी राहत असल्याचे सांगताना पूर्णिमा भावे यांनी आपल्याला आलेले अनुभव यावेळी विशद केले.

चित्रपट, मालिका, वेशभूषा, मेकअप या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या मंडळींनी कुठेतरी सहाय्यक म्हणून सुरवात केली तर त्यांना चांगला अनुभव मिळून ते या क्षेत्रात चांगले करियर घडवू शकतात, असे मत या सर्व जणींनी व्यक्त केले. आतापर्यंतच्या प्रवासात कुटुंबाने चांगली साथ दिली, त्यामुळे इथपर्यंत पोहचणे शक्य झाल्याचे सर्वांनीच सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading