Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्यातील संस्थेने रस्ते निर्मिती क्षेत्रात रचला अनोखा विक्रम

पुणे  : पुणे शहर आणि परिसरात सुरु असलेल्या पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे पुन्हा एकदा उच्च दर्जाच्या चांगल्या रस्त्यांची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी करण्यात आलेला रस्त्यांचा उत्तम विकास हा आपल्या पुणे जिल्ह्यातील रहिवाशांना नजीकच्या भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरणार असून देशाच्या, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम रस्त्यांचे महत्व यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर रस्ते बांधणी व पायाभूत सोयीसुविधांचा विकास या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन या संस्थेने आंध्र प्रदेशातील बंगळूर-विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉर (एनएच – ५५४जी) च्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या पॅकेज २ व पॅकेज ३ यांवर रस्ते बांधकाम क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करीत चार गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करीत अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. संस्थेने ही अभूतपूर्व कामगिरी ५ जानेवारी ते ११ जानेवारी, २०२६ दरम्यान केली. याविषयीची अधिक माहिती आज राजपथ इन्फ्राकॉनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

१९८८ साली स्थापन झालेल्या पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन या कंपनीला देशभरातील महत्त्वाचे आणि जटील असे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्याचा तीन दशकांहून अधिक अनुभव आहे असे सांगत जगदीश कदम म्हणाले की, “राजपथ इन्फ्राकॉनने नुकतेच आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थीजवळ एकूण चार गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित करण्याचे यशस्वी प्रयत्न केले. यामध्ये २४ तासांत सलगपणे टाकण्यात आलेला बिटुमिनस काँक्रीटचा सर्वांत लांब पट्टा (९.६३२ किमी, ३ पदरी) म्हणजेच २८. ८९ किमी एक पदरी रस्ता, २४ तासांत टाकण्यात आलेले बिटुमिनस काँक्रीटचे सर्वाधिक प्रमाण (१०,६५७ मेट्रिक टन), सलगपणे टाकण्यात आलेला बिटुमिनस काँक्रीटचा सर्वात लांब (५२.४१ किमी, तीन पदरी ) पट्टा, म्हणजेच १५७ किमी एक पदरी (या आधीचा हा विक्रम राजपथ इन्फ्राकॉनच्या नावावर आहे, ४२.२ किमी, २-लेन, जो २०२२ मध्ये प्रस्थापित केला गेला होता तो यावेळी मोडीत काढण्यात आला) आणि सलगपणे टाकलेल्या बिटुमिनस काँक्रीटचे सर्वाधिक प्रमाण (५७, ९८२ मेट्रिक टन) या विक्रमांचा समावेश आहे. गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मूल्यांकन संघाद्वारे त्यांची पडताळणी पूर्ण होऊन आता त्याचे प्रमाणपत्र संस्थेला मिळाले आहे.”

सदर विक्रम करीत असताना फीडरसह एक सेन्सर पेव्हर, ५ हॉट-मिक्स प्लांट्स, ७० हायवा टिपर्स, १२ टँडम रोलर्स, ५ न्यूमॅटिक-टायर्ड रोलर्स (PTRs), ८०० हून अधिक राजपथमधील सहाय्यकांचे अचूक समन्वयन आणि सातत्याने चोवीस तास केलेले अविरत परिश्रम यांच्या जोरावर सदर विश्वविक्रम करणे शक्य झाले असे सांगत कदम पुढे म्हणाले की, “भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) मार्गदर्शनाखाली आणि कठोर गुणवत्ता, सुरक्षा व अभियांत्रिकी मानकांचे काटेकोरपणे पालन करून हा विक्रमी प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नाला आयआयटी मुंबई (स्थापत्य अभियांत्रिकी विभाग) आणि सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ यांचे तांत्रिक आणि गुणवत्ता-निरीक्षण सहकार्य मिळाले. याबरोबरच संपूर्ण कामादरम्यान कठोर प्रयोगशाळा चाचणी, रिअल-टाइम डेटा निरीक्षण आणि सतत गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता आश्वासन सुनिश्चित करण्यात आले होते हे विशेष.”

या आधी मे २०२१ मध्ये कोविड-१९ महामारीच्या काळात कंपनीने महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पुसेगाव ते म्हसुरणे दरम्यान, केवळ २४ तासांत तब्बल ३९.६९१ किलोमीटर डांबरी काँक्रीटचा रस्ता तयार करून आपला पहिला विक्रम प्रस्थापित करीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून मान्यता मिळवली. यानंतर बरोबर एक वर्षानंतर, ३ ते ७ जून, २०२२ दरम्यान देशाचा ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याच्या निमित्ताने, राजपथ इन्फ्राकॉनने अमरावतीमध्ये भारताच्या रस्ते, पायाभूत सोयीसुविधा या क्षेत्रात पहिला गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून भारताला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले. यावेळी सुरतला कलकत्त्याशी जोडणारा एनएच- ५३ (पूर्वीचा एनएच ६ महामार्ग) यावर ७५ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा (४२.२ किलोमीटर, २-लेन) डांबरी काँक्रीटचा रस्ता तयार केला गेला होता, अशी माहिती कदम यांनी दिली.

भारतमाला परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत राबवल्या जाणाऱ्या बंगळूर-विजयवाडा आर्थिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या रस्त्यांचा या विक्रमामध्ये समावेश असून एनएच ५५४ जी हा राष्ट्रीय महामार्ग बंगळूर (कर्नाटक) आणि विजयवाडा (आंध्र प्रदेश) यांना जोडत दक्षिण आणि पूर्व भारतादरम्यान एक कार्यक्षम दुवा निर्माण करण्याचे काम करीत आहे. या महामार्ग विकासामुळे आर्थिक वाढीला, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार असून नजीकच्या भविष्यात या मार्गावर स्थावर मालमत्तेच्या अनेक संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. याबरोबरच हा कॉरिडॉर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि कृषी केंद्रांना पूर्वेकडील प्रमुख बंदरांशी जोडण्यासाठी आता सुसज्ज झाला आहे.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगात यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच महामार्गावर, एकाच संस्थेद्वारे, एकाच सलग मोहिमेत, सलग चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स करण्याचा अशा प्रकारचा विश्वविक्रम  करण्याचा प्रयत्न केला गेला नाही, त्यामुळे राजपथ इंफ्राकॉनने नोंदविलेले हे विक्रम म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरतात याकडे कदम यांनी लक्ष वेधले.

राजपथ इंफ्राकॉनच्या वतीने नोंद झालेलेल हे चारही विक्रमी प्रयत्न एनएचएआयच्या गुणवत्ता मानकांनुसार आणि गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या पडताळणी प्रक्रियेनुसार पूर्णपणे केले गेले असून या प्रयत्नांच्या यशस्वी पूर्ततेनंतर त्याचे अधिकृत प्रमाणपत्र जगदीश कदम यांनी ‘विकसित भारता’च्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहत राष्ट्राला समर्पित केले आहे हे विशेष.

नुकतेच १२ जानेवारी, २०२६ रोजी झालेल्या सन्मान व समर्पण सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आंध्र प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादवज, आंध्र प्रदेशचे रस्ते आणि इमारती मंत्री बी. सी. जनार्दन रेड्डी, खासदार बी. के. पार्थसारथी, आमदार पल्ले सिंधुरा रेड्डी आणि माजी मंत्री पल्ले रघुनाथ रेड्डी यांनी उपस्थिती लावली.

या गिनेज वर्ल्ड रेकॉर्डची ही ऐतिहासिक कामगिरी जगदीश कदम यांनी भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाला समर्पित केली आहे शिवाय ही कामगिरी केवळ एक विक्रम मोडणारी कामगिरी नसून, हे यश वेग, व्याप्ती आणि कोणतीही तडजोड न करता उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचा एक शक्तिशाली पुरावा असून अशा प्रयत्नांमुळे देशाला आधुनिक महामार्ग अभियांत्रिकीमध्ये अग्रेसर स्थान मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न आहे, असेही कदम म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading