जनतेच्या पैशातून लांगुलचालन नको: बाळासाहेब थोरात यांचा इशारा
पुणे: प्रतिनिधी
तिजोरी ही जनतेच्या पैशातून तयार होते. सत्तेवर जाणाऱ्यांनी त्या पैशांची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे. विकासाच्या नावाखाली होणारा खर्च हा पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण, आरोग्य यासाठी व्हावा, कोणाच्या लांगूलचालनासाठी नव्हे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आघाडीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसली नाही तरी काँग्रेस ही लोकांच्या मनात रुजलेली आहे. निवडणुका जर निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्या तर काँग्रेसला निश्चितच यश मिळेल. अनेक मोठी पदे भूषवणारे नेते विविध अमिषे आणि दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले. त्यामुळे आज भाजपामध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसत असून काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे.
थोरात यांनी सांगितले की, काँग्रेस हे बुडणारे जहाज नसून आत्मविश्वासाने पाण्यावर तरंगणारे जहाज आहे. सध्या पदे कमी असली तरी पक्षाची ताकद कायम आहे. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नसून महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे दाखवणारी निवडणूक आहे. राज्याच्या जडणघडणीत पुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
निवडणूक आयोगाकडून वारंवार वेळापत्रक बदलणे, नियमांमध्ये अचानक बदल, उमेदवारांना अपील करण्यास अडथळे, अर्ज माघारीसाठी दहशत व दबावतंत्र, बिनविरोध निवडणुका या बाबी गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. भाजपाने सर्व नियम मोडीत काढून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला.
पुण्यात वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण, गुन्हेगारी, पाण्याची भीषण समस्या यावर सत्ताधारी ठोस भूमिका घेत नाहीत. सत्ता मिळवून भ्रष्टाचार करणे हे भाजपाचे धोरण आहे. केवळ प्रगतीच्या गप्पा मारून काहीही साध्य होणार नाही. सुसंस्कृत, विचाराधिष्ठित आणि निकोप महाराष्ट्र घडवण्यासाठी मतदारांनी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन थोरात यांनी केले.
