किमती विदेशी फाउंटन पेनची पुणेकरांना भुरळ
पुणे : मोंटेग्राप्पा, एस टी ड्युपॉन्ट, विस्कोन्टी, वॉटरमॅन, डिप्लोमॅट, पेनिन्फेरिना यांसारख्या आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सचे किमती पेन सध्या पुणेकरांना भुरळ घालत असून त्यांना पाहण्यासोबतच त्यांची खरेदी करायला पुणेकर नवव्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाला हजेरी लावत आहेत. एरंडवणे येथे म्हात्रे पुलाजवळ असलेल्या डी पी रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स येथे ११ जानेवारी पर्यंत होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवात पुणेकरांना देश-विदेशातील फाउंटन पेन सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत पाहता येणार आहेत.
पुण्यातील रायटिंग वंडर्स संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या नवव्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे उद्घाटन कोहिनूर समूहाचे संस्थापक कृष्णकुमार गोयल, पीएनजी एक्स्क्लुझिव्हचे अभय गाडगीळ, जेएसपीएम विद्यापीठाचे प्रा. डॉ. बी. बी. अहुजा आणि रायटिंग वंडर्स संस्थेचे सुरेंद्र करमचंदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले.
पेनमध्ये तलवारीपेक्षा अधिक ताकद आहे, त्यामुळे त्याचे महत्व मोठे असल्याचे मत उद्घाटन प्रसंगी बोलताना कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले. पुण्यामध्ये होत असणारा हा पेन महोत्सव शहरासाठी गौरवाची गोष्ट आहे, त्यामुळे लेखन संस्कृती वाढण्यास अधिक चालना मिळणार असल्याचेही गोयल म्हणाले. आपल्या डोक्यात एखादी कल्पना आली की ती कागदावर उतरवण्याचे काम पेन करते, त्यामुळे त्याचे महत्व मोठे असल्याचे प्रा. डॉ. बी. बी. अहुजा यांनी सांगितले.
विदेशातील प्रसिद्ध ब्रॅण्डखेरीज या महोत्सवामध्ये ७५ हून अधिक पेन उत्पादकांचे विविध पद्धतीचे पेन पाहण्याची व त्यांना हाताळण्याची पर्वणी पेन प्रेमींना यानिमित्ताने मिळेल. यामध्ये विस्कोन्टी, मोंटेग्राप्पा, वॉटरमॅन, डिप्लोमॅट, एस टी ड्युपॉन्ट, पेनिन्फेरिना यांसारख्या आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सचा समावेश असेल. पार्कर प्रीमियम गिफ्ट सेट्स, बदलता येण्याजोग्या तीन बॅरल्ससह पायलट कस्टम ७४ ॲनिव्हर्सरी लिमिटेड एडिशन आणि ‘एमिली इन पॅरिस’ या नेटफ्लिक्स वरील सिरीज मधील शेफर कलेक्शन हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. या खेरीज लॅमी, कलरव्हर्स, नूडलर्स, पेलिकन, डायमाइन यांसारखे भारत व जगभरातील १५ पेक्षा जास्त शाईचे ब्रँड्स,\ ५०० पेक्षा जास्त छटा असलेले शाईचे प्रकार इथे उपलब्ध आहेत.
‘भारत की लेखन सामुग्री’ या विषयावरील अनोखे प्रदर्शन या ठिकाणी असून दोनशे वर्षाहून अधिक जुने फक्त लेखनासाठी वापरण्यात आलेले साहित्य, दरबारात बसणारे चिटणीस, त्यांचे लाकडी टेबल, त्यांच्या बसण्याच्या पद्धती, त्यांचे सर्व साहित्य पुणेकरांना या महोत्सवात पाहता येणार आहे. याशिवाय दगडावर कोरण्यासाठी व लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी साधने, कापड, लाकूड, ताडपत्र, भूर्जपत्र, कागद अशा इतरही पृष्ठभागांवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी साधने अशा १०० पेक्षा अधिक प्रकारांची माहिती पुणेकरांना पाहता व अनुभवता येणार आहे.
इटलीच्या ‘मोंटेग्राप्पा’ या पेनची निर्मिती करणाऱ्या आघडीच्या कंपनीने प्रसिद्ध चित्रकार मायकल अँजेलो यांच्या ५५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रसिद्ध पेंटिंगची प्रेरणा घेऊन हाताने तयार केलेल्या आणि सोन्याचा मुलामा असणाऱ्या पेनची निर्मिती केली आहे, त्यापैकी दोन पेनची विक्रीही नुकतीच पुण्यात झाली यावरून पुणेकरांचे पेन प्रेम लक्षात येईल. हा पेन पूर्णपणे हाताने तयार केलेला असून तो करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागला आहे. या पेनवर आकर्षक डिझाइन असून त्यामध्ये सोन्याचा वापर कऱण्यात आला आहे. पेनची निब १८ कॅरेट सोन्याची असल्याचे मोंटेग्राप्पाचे प्रदर्शनातील औपचारिक विक्रेत्यांनी सांगितले.
१८७२ मध्ये स्थापन झालेल्या फ्रान्समधील एस. टी. ड्युपॉन्ट या कंपनीचे पेन देखील पेन महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले असून सव्वा दोन लाख रुपयांची किंमत असणाऱ्या या पेनला चायनीज लँगर आहे, त्यामुळे हे पेन या महोत्सवामध्ये आकर्षण ठरले आहे, पेनला सोन्याचा मुलामा असून त्याचे नीब देखील सोन्याची असल्याचे उपस्थित विक्रेत्यांनी सांगितले.
