Thursday, October 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

यंदाच्या वाईल्डलाईफ फेस्टिवलमध्ये ऐका ताडोबातील वाघांच्या गोष्टी

पुणे : झपाट्याने कमी होत असलेल्या जंगलांचे व वन्यप्राणी संवर्धनाचे महत्व मुलांना योग्य वेळी कळावे यासाठी जंगल बेल्स, नेचर वॉक चॅरीटेबल ट्रस्ट व बोगनवेल फार्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाईल्डलाईफ फेस्टिवल फॉर किड्स’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास पुणे वन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभले आहे.

वाईल्डलाईफ फेस्टिवल फॉर किड्स या उपक्रमाची ही तिसरी आवृत्ती असून यंदाच्या फेस्टिवलची थीम महाराष्ट्रातील लोकप्रिय ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकप्लावर आधारित अर्थात ताडोबा स्पेशल आहे. येत्या शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर असलेल्या बोगनवेल फार्म्स येथे सदर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम मुलांसह त्यांच्या पालकांसाठी देखील खुला आहे याची कृपया नोंद घ्यावी.

वाईल्डलाईफ फेस्टिवल फॉर किड्स (ताडोबा स्पेशल) विषयी माहिती देतांना जंगल बेल्सच्या संस्थापिका हेमांगी वर्तक म्हणाल्या की, पुण्यातील सर्व वन्यजीव प्रेमींना ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाबद्दल कायमच आकषर्ण राहिले आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत यावर्षीचा फेस्टिवल आम्ही ताडोबा स्पेशल करत आहोत.

फेस्टिवल मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक (बफर) ताडोबातील विविध बफर झोनच्या यशस्वी निमिर्तीमागची कथा उलगडतील. ताडोबा येथील विविध बफर झोनची निर्मिती व त्यांचे व्यवस्थापन एक मोठे आव्हान आहे. बफर झोन मध्ये मानवी वस्ती असते. एका अंदाजानुसार ताडोबाच्या बफर झोन सुमारे २ लाख इतकी मानवी वस्ती व २०० वाघ आहेत. त्यामुळे वने व वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी स्थानिक रहिवाश्यांच्या सहकार्याची मोठ्या प्रमाणात गरज असते. ताडोबातील प्रसिद्ध माया वाघिणीवर असलेल्या ‘एक होती माया’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक अनंत सोनावणे माया वाघिणीच्या काही चित्तथरारक गोष्टी यानंतर उपस्थितांना सांगतील.

ताडोबाचे रेस्क्यू मॅन म्हणून नावलौकिक असलेले डॉ. रविकांत खोब्रागडे त्यांनी ताडोबाच्या जंगलात हाताळलेल्या काही रोमांचक टायगर रेस्क्यू ऑपरेशन विषयी माहिती फेस्टिवल दरम्यान पुण्यातील ताडोबाप्रेमींना देतील. तसेच, टायगर लीगसी फिल्म्स सर्व्हिसेसचे सुमेश लेखी यांनी ताडोबातील वाघांवर चित्रित केलेल्या काही अप्रतीम व्हीडीओचे सादरीकरण करतील. यावेळी नल्ला मुत्थू यांनी ताडोबा वर केलेली एक फिल्म देखील दाखवण्यात येणार असल्याचे नेचर वॉक चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अनुज खरे यांनी सांगितले.

भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी गौरवलेले व २०० हून अधिक पक्षी व प्राणी यांचे हुबेहूब आवाज काढण्यासाठी प्रसिद्ध असलेले ताडोबाचे बर्डमॅन सुमेध वाघमारे यांचे ताडोबा जंगलातील अनुभव कथनाचे सत्र या ‘वाईल्डलाईफ फेस्टिवल फॉर किड्स’चे विशेष आकर्षण असेल. वाघमारे यावेळी जंगलात आढळणाऱ्या विविध पशुपक्षांचे आवाज देखील काढून दाखवतील. ज्यासाठी ते लोकप्रिय आहेत.

वाईल्डलाईफ फेस्टिवल फॉर किड्सचे उद्घाटन पुणे वनविभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, ताडोबाचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व पुण्यातील वन्यजीवप्रेमी संजय देशपांडे यांच्या उपस्थितीत होईल.

Leave a Reply