Friday, April 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुणे शहराला सर्वोत्तम करण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा चे दर्शन घेऊन प्रभाग 8 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

पुणे : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष हा विचाराने आणि लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. निवडणूक असो वा नसो बारा महीने 24 तास काम करणारा भाजपचा कार्यकर्ता असतो. पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसची अवस्था बिकट आहे. त्यांना निवडणुकीसाठी उमेदवार सुद्धा सापडत नाही. त्यांनी उमेदवार आयात केले आहेत. पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर करायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. आम्हाला केवळ सत्ता नको आहे तर जनतेची सेवा करायची आहे, असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री, पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्ष  व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या वतीने सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ती अजित गायकवाड, सपना आनंद छाजेड हे चार उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा चे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी मुरलीधर मोहोळ बोलत होते. यावेळी शिवाजीनगा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांसह भाजप व आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील पाच वर्षात आम्ही पुणे महापालिकेत जे काम केले; त्यामाध्यमातून पुणे शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मागील सहा वर्षातील आमदार म्हणून सिद्धार्थ शिरोळे यांचे काम, देशातील मोदी सरकारचे काम आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारचे काम पाहिले तर घरोघरी सरकारी योजनेचा लाभार्थी सापडतो. आम्हाला केवळ सत्ता नको आहे तर जनतेची सेवा करायची आहे.

यावेळी सनी निम्हण म्हणाले, स्वर्गीय मंत्री चंद्रकात छाजेड साहेबांचा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार आणि स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण साहेबांची काम करण्याची धमक घेऊन आम्ही चारही उमेदवार या प्रभागाचा समतोल आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू.अन्न,वस्त्र,निवारा या बरोबरच शिक्षण आणि आरोग्य सुविधा या मूलभूत गरजा आहेत. यामुळे बोपोडी परिसरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, या भागात महापालिकेचे दोन दवाखाने आहेत त्यांना दर्जेदार करण्याबरोबरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल तसेच दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी इ लॉर्निंग स्कूल सुरू करू असा शब्द त्यांनी दिला. तसेच सर्व जाती- धर्मांना सोबत घेऊन विकास करण्यासाठी आम्ही जनते समोर जात आहोत असेही नमूद केले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, राज्यात आणि देशात आज डबल इंजिन सरकार आहे, पुणे शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी पुणे शहरात सुद्धा भाजपला बहुमत द्या म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार पुणे शहराला विकासाच्या सुपरफास्ट मार्गावर घेऊन जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading