माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन
पुणे प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या निधनाने पुणे शहरावर शोक कळा पसरली आहे.
कलमाडी यांच्या निधनानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिकांनी कलमाडी हाऊस या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. त्यांच्या पार्थिवावर दुपारी तीन वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कलमाडी यांनी लोकसभेत दीर्घकाळ पुण्याचे प्रतिनिधित्व केले. पुणे फेस्टिवल आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या माध्यमातून कलमाडी यांनी पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक ठळक केले. रेल्वेमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी कोकण रेल्वे सुरू करण्याच्या आव्हानात्मक प्रयत्नांना कलमाडी यांच्या कार्यकाळात मूर्त स्वरूप आले. रेल्वे स्थानकांची सुशोभीकरण व आधुनिकीकरण यासाठी कलमाडी यांनी उल्लेखनीय कार्य केले. राजकारण, समाजकारण याबरोबरच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात कलमाडी यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
एअर फोर्स पायलट ते केंद्रीय मंत्री : सुरेश कलमाडी यांचा राजकीय प्रवास
सुरेश कलमाडी हे काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रशासक म्हणूनही त्यांनी मोठी ओळख निर्माण केली. १९९५-९६ या काळात ते पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यांच्या संकेतस्थळानुसार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर केला होता.
पुणे येथील रहिवासी असलेल्या कलमाडी यांनी १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर ते भारतीय हवाई दलात वैमानिक (पायलट) म्हणून रुजू झाले. त्यांनी सहा वर्षे हवाई दलात सेवा बजावली. त्यानंतर १९७४ पर्यंत दोन वर्षे एनडीएत प्रशिक्षक म्हणूनही कार्य केले. १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानविरोधातील युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता.
संजय गांधी यांनी सुरेश कलमाडी यांना राजकारणात आणले. त्या काळात ते पुण्यात फास्टफूडचे दुकान चालवत होते. काही काळ त्यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेतृत्व केले आणि १९८२ मध्ये ते राज्यसभेचे खासदार झाले. १९९६ मध्ये कलमाडी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष बनले. सलग दोन चार वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवडून येत त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला.
कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याच्या चौकशीची आंच कलमाडी यांच्यापर्यंत पोहोचली होती. आर्थिक अनियमिततेच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. मात्र, पुराव्याअभावी गेल्या वर्षी न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली.
