दलित उद्योजकासाठी राज्यस्तरीय विशेष विक्रेता परिषद संपन्न
पुणे: दलित उद्योजकांसाठी तसेच नवीन स्टार्ट अप साठी आपल्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळावी तसेच शासकीय विविध कंपन्याना लागणारा कच्चा माल पुरवठा व त्याबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून दलित उद्योजकांसाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती–जमाती हब (NSSHO) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विशेष विक्रेता विकास कार्यक्रम (Special Vendor Development Programme – SVDP) आज पुणे येथील हॉटेल सेंट्रल पार्क, येथे यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाचा उद्देश अनुसूचित जाती – जमाती व महिला उद्योजकांना सार्वजनिक शासकीय कंपन्यांशी थेट व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे हा होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटन व सत्कार समारंभात डिक्कीचे पदाधिकारी डिक्की महिला विंगच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ. सीमा कांबळे, ललित बनसोड, अध्यक्ष पुणे चॅप्टर तसेच डिक्कीचे पश्चिम भारत विभागाचे माजी अध्यक्ष अविनाश जगताप प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळचे क्षेत्रीय प्रमुख डी. डी. माहेश्वरी, राष्ट्रीय एससी-एसटी हब पुण्याचे प्रभारी श्रितेश रंगारी व जेम पोर्टल ची माहिती देण्यासाठी अंकुश माकडे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रदीप बागुल व सचिन दिगोलकर यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
या एकदिवसीय कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) तसेच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) यांसारख्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी विक्रेता नोंदणी प्रक्रिया, खरेदी धोरणे व उपलब्ध व्यावसायिक संधींबाबत सविस्तर सादरीकरणे केली. या कार्यक्रमादरम्यान डिक्की बिझनेस फेसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून उद्योजकांना उद्योग नोंदणी, शासकीय योजना, निविदा सहभाग, वित्तपुरवठा तसेच बाजारपेठ जोडणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डिक्की बिझनेस फेसिलिटेशन सेंटर हे उद्योजकांसाठी एकाच छताखाली सर्वसमावेशक उद्योग सहाय्य सेवा उपलब्ध करून देणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे यावेळी अधोरेखित केले. तसेच जेम पोर्टल विषयी विशेष मार्गदर्शन यावेळी श्री. अंकुश माकडे यांनी केले प्रश्नोत्तर सत्र, विक्रेता नोंदणी ऑनबोर्डिंग तसेच नेटवर्किंग हाय टी यामुळे उद्योजकांना थेट संवादाची संधी मिळाली. या कार्यक्रमाला 100 पेक्षा जास्त उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
