मुलांच्या जाणिवजागृतीसाठी हसतखेळत दिलेला संदेश हे ग्रिप्स थिएटरचे वैशिष्ट्य
जर्मनीतील ग्रिप्स थिएटरचे संस्थापक फोल्कर लुडविग यांचे प्रतिपादन
पुणे – मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांच्या जाणिवजागृतीचा विकास आणि हास्यरसातून कळत नकळत दिलेला संदेश, हे ग्रिप्स थिएटरचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन जर्मनी येथील ग्रिप्स थिएटरचे संस्थापक फोल्कर लुडविग यांनी केले. ग्रिप्स थिएटरला भारतात ४० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने लुडविग यांनी ग्रिप्सशी संबंधित पुण्यातील व्यक्तींशी पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या एक कार्यक्रमात संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. दरवर्षी पुण्यात ग्रिप्स नाट्यमहोत्सवाचे आयोजन करणाऱ्या रेनबो अम्ब्रेला फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात लुडविग यांच्यासह डाॅ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, श्रीरंग गोडबोले, विभावरी देशपांडे, ह्रषिकेष देशपांडे, शुभांगी दामले, संगीतकार राहुल रानडे, राधिका इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
लुडविग म्हणाले, ग्रिप्स थिएटरची संकल्पना विद्यार्थी चळवळीतूनच पुढे आली. मात्र, भारताइतकी ती इतरत्र यशस्वी झाली नाही. या थिएटरचे सातत्यही भारतासारखे कुठेच टिकले नाही. मनोरंजनाच्या माध्यमातून एखाद्या विषयासंबंधी जागरूकता निर्माण करणे व हसतखेळत दिलेला संदेश, हा ग्रिप्स थिएटरचा गाभा आहे. ग्रिप्स थिएटरला भारतात ४० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने येत्या वर्षभरात ग्रिप्स थिएटर, जर्मनी आणि भारतातील ग्रिप्स नाट्यचळवळ यांचे काही संयुक्त उपक्रम हाती घेतले जातील, त्याविषयी मलाही उत्सुकता आहे.
डाॅ. मोहन आगाशे म्हणाले, एका कार्यशाळेच्या निमित्ताने १९८३ च्या सुमारास ग्रिप्सविषयी समजले. तेव्हाच ग्रिप्स थिएटर हे कुणाला वाचून, समजावून सांगण्याऐवजी त्याचा थेट अनुभवच दिला पाहिजे, याची जाणीव झाली आणि पहिली ग्रिप्स निर्मिती छान छोटे वाईट्ट मोठ्ठे या प्रकल्पामधून झाली. याचे मूळ अर्थातच जर्मन होते. या नाटकामध्ये केंद्रस्थानी असलेला बंकर बेड प्रेक्षकांना आवडला. मध्यमवर्गीयांच्या घरांमध्ये बंकर बेड्सचा वापर कदाचित याच नाटकानंतर सुरु झाला. १९८५ नंतरचा काळ स्थित्यंतराचा होता. आपल्याकडेही याच काळात आईवडील दोघेही कामावर जाणे, ही गोष्ट वाढीस लागली. त्यातून मुलांचे काही प्रश्न नव्याने समोर आले. त्यावर भाष्य करणारा आशय मुलांच्या व मुलांसाठीच्या वास्तववादी रंगभूमीच्या माध्यमातून ग्रिप्सच्या रुपाने मांडण्याचा यशस्वी प्रयत्न झाला.
विभावरी देशपांडे म्हणाल्या, कलाकार म्हणून मला ग्रिप्स थिएटरने घडवले. आज काळ वेगाने बदलत आहे. काळासोबत मुलांच्या भावविश्वातही बदल घडत आहेत. नवी माध्यमे, तंत्रज्ञान, त्याची मुलांसाठी सहज उपलब्धता, डिजिटल व्यासपीठे यामुळे मुलांना मुलांसाठीच्या गोष्टी सांगण्याच्या नव्या पद्धतीही शोधाव्या लागतात. आगामी वर्षभरात भारत आणि ग्रिप्स थिएटर, जर्मनी, असे एकत्रित प्रकल्प या संदर्भात नियोजित आहेत. नव्या प्रकल्पांमध्ये जुन्याची प्रेरणा असेल व त्यामध्ये पालक आणि मुले, यांच्यातील नाते, हा विषय केंद्रस्थानी राहील. हवामान बदल, वाढती कट्टरता, असेही विषय देखील असतील. भारतात ग्रिप्स थिएटरची सर्जनशील बाजू अधिक सशक्त व्हावी म्हणून डायरेक्टर रेसिडेन्सी, असा उपक्रम आयोजित करण्यात येईल. भारतात ग्रिप्स थिएटरला ४० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने डिसेंबर २०२५ ते डिसेंबर २०२६ या काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची परिणती एखादे नवे ग्रिप्स नाटक किंवा लघुपटाच्या निर्मितीने होईल. श्रीरंग गोडबोले यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले व राधिका इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.
