Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कंठसंगीताच्या मानकऱ्यांनी सुरेल सादरीकरणाने गाजवला शेवटच्या दिवसाचा पूर्वार्ध

पाचव्या सत्रात बुजुर्गांसह तरुण प्रतिभेचा स्वराविष्कार

पुणे : कंठसंगीताच्या मानकऱ्यांनी ‘सवाई’च्या रविवारच्या पाचव्या व शेवटच्या सत्राचा पूर्वार्ध सुरेल सादरीकरणाने गाजवला. बुजुर्गांसह तरुण कलाकारांच्या सांगीतिक प्रतिभेचे अनेक आश्वासक उन्मेष रसिकांसमोर आले.

आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ७१ वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रांगणात सुरू आहे. रविवारी महोत्सवाच्या पाचव्या सत्राची सुरुवात पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि प्रसिद्ध गायक पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने झाली. पं. भट यांनी गायनाची सुरुवात राग कोमल रिषभ आसावरी मधील ‘सबही मेरा होत…’ या विलंबित एकतालातील रचनेने केली. ‘मै तो तुमरो दासी…’ ही रचना सादर केल्यानंतर हिंडोलबहार रागातील ‘कोयलिया बोले चली जात…’ ही बंदिश त्यांनी प्रस्तुत केली. राघवेंद्र स्वामींचे कन्नड भजनही त्यांनी सादर केले. ‘समचरण तुझे देखिले…’ हा वारकरी संप्रदायातील अभंग आणि ‘याचसाठी केला होता अट्टाहास…’ ही भक्तीरचना सादर करत त्यांनी विराम घेतला. त्यांना निरंजन लेले (हार्मोनिअम), सचिन पावगी (तबला), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), गणेश चाकणकर (पखवाज), माऊली टाकळकर (टाळ) आणि विनायक हेगडे, धनंजय भाटे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

युवा गायिका श्रृती विश्वकर्मा मराठे यांनी राग पटदीपमधील ‘नैया मोरी पार…’ ही त्रितालातील बंदिश आणि त्याला जोडून ‘जागे मोरे भाग महाराज…’ या बंदिशीतून रागरूप समर्थपणे मांडले. या दोन्ही बंदिशी श्रृती यांच्याच होत्या. पाठोपाठ द्रुत एकलातील ‘तानुम तनन तदरे दानी…’ हा तराणाही त्यांनी पेश केला. ‘निर्भय निर्गुण…’ या कबीरांच्या निर्गुणी भजनाने श्रृती यांनी समारोप केला. सुरेल, तयारीचा आवाज आणि प्रसन्न सादरीकरण,  यामुळे सुरवातीपासूनच पटदीपने पकड घेतली. द्रुत लयीतील गायनातून श्रृती यांची लयकारी, आकर्षक ताना यांचाही प्रत्यय आला. ‘सवाई’ च्या स्वरमंचाला आणि गुरुपरंपरेला माझे साष्टांग अभिवादन आहे. मला इथे सादरीकरण करण्याची संधी मिळाली यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते, अशा शब्दांत श्रृती यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांना लीलाधर चक्रदेव (हार्मोनिअम), प्रणव गुरव (तबला) आणि अदिती पोटे व तेजल कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथ केली.

यावर्षीच्या सवाईच्या स्वरमंचावरचा सर्वात तरुण गायक अनिरुद्ध ऐताळ यांनी राग मुलतानीमधील ‘एरी बात ना माने…’ या विलंबित एकतालातील रचनेने सुरुवात केली. अतिशय शांत, संथ आलापीतून राग उलगडत नेण्याचे त्यांचे कौशल्य उल्लेखनीय वाटले. गायनातील सहजता आणि सुरेलताही लक्षवेधक होती. ‘साहेब झमाल…’ या रचनेतून रागाची परिपूर्ण मांडणी समोर आली. ‘लागी लागी रे सावरिया…’ या द्रुत त्रितालातील रचनेतून आणि ‘नैननमे आनबान…’ लवचिक आवाज, गमक प्रयोग, स्वरांची आकर्षक पुनरावृत्ती, स्पष्ट दाणेदार ताना यामुळे अनिरुद्ध यांचे गायन अतिशय प्रभावी ठरले. ‘मोक्षसदना मोह हरणा…’ हे कन्नड रंगगीत (परवशता पाश दैवे, या नाट्यपदासारखे) अतिशय ढंगदारपणे सादर करून अनिरुद्ध यांनी दाद मिळवली. पहाडी, पिलू यांचे हे मिश्रण पकड घेणारे ठरले. किरवाणी रागावर आधारीत भक्तीरसपूर्ण रचनेने त्यांनी समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), रवींद्र कातोटी (हार्मोनिअम) तसेच अक्षय तावडे व दिगंबर जाधव (तानपुरा) यांनी साथ केली.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार मागील ८ दशकांहून अधिक काळ कलाकारांच्या चार पिढ्यांना टाळसंगत करणाऱ्या पुण्याच्या माऊली टाकळकर यांना आज ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रदान करण्यात आला. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे आज तो माऊली टाकळकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मूळगुंद, मिलिंद देशपांडे, डॉ. प्रभाकर देशपांडे आणि आनंद भाटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading